Friday, December 24, 2010

आहार

ॐ                   आहार                                           २४-१२-२०१०
सगळीकडेच खूप मस्त थंडी पडलीय़ॆ. अशा थंडीत साहजिकपणेच काही तरी स्पाईसी खावंसं वाटतं, नाही का? स्पाईसी खायचं म्हणजे त्यात स्पाईसेस असणारचं आणि स्पाईसेस म्हणजे आपले मसाल्याचे पदार्थ जे भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग असतात. अगदी भाजीच्या फ़ोडणीपासून ह्या मसाल्यांच्या वापराची सुरुवात होते. साधी आपली मोहरी, हळद आणि हिंग हे फ़ोडणीचे तीन बेसिक घटक मसाल्याच्याच पदार्थातले आहेत आणि मसाले म्हणजे तिखट, चटपटीत, जेवणाला चव देणारे अशी आपल्याला त्यांची साधारण ओळख असते पण आयुर्वेद ह्या पदार्थांचे औषधी गुणधर्म सांगतो. वास्तविक त्यांचा रोजच्या जेवणात वापर करण्यामागे महत्त्वाची संकल्पना अशी असावी की रोजच्या रोज थोड्याशा प्रमाणात त्यांचे गुण जेवणातून पोटात जावेत. सगळ्याच मसाल्याच्या पदार्थांचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते ज्या पदार्थात घातले जातात त्याची चव वाढवतात. मसाल्याच्या पदार्थांचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे ते काही प्रमाणात अन्नपचनालाही मदत करतात. पण जवळ जवळ सगळेच मसाल्याचे पदार्थ हे गरम-ऊष्ण, तिखट असतात, त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास असतो किंवा इतरांनीही ते जपूनच वापरले पाहिजेत आणि खरं सांगायचं तर कुठल्याही पदार्थात प्रमाणापेक्शा जास्त मसाले पडले तर त्याची चवच बिघडते. आता स्पाईसेस यादीतल्या नेहमीची मंडळींची ही थोडी ओळख- मोहरी-सरसों(मस्टर्ड), हळद(टर्मरिक), हिंग(असॆफ़ोटीडा) हे प्रत्येक फ़ोडणीचा बेस ह्याशिवाय तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, जावित्री, आलं,लसूण,ओवा,वेलची-छोटी आणि मोठी, जावित्री, जायफ़ळ, मिरची इ.
हे सगळे जरी मसाल्याचे पदार्थ ह्या कॅटेगरीत मोडणारे असले तरी प्रत्येकाची स्वत:ची वेगळी प्रॉपर्टी आहे.
हळद, सगळ्यात बेस्ट ब्लड प्युरीफ़ायर. भारतात लग्नाच्या आदल्या दिवशी वधू-वरांना हळद लावण्याची प्रथा आहे.  हळद जशी इंटर्नली घेता येते तशी ती एक्सर्टनली सुद्धा वापरता येते. ब्लड प्युरिफ़ायर असल्यामुळे ती त्वचेचा रंग उजळण्याचं काम करते. हळदीची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अ‍ॅटीसेप्टीकचं कामही खूप मस्त करते आणि जखमेतलं रक्त थांबविण्याचं कामही करते. त्यामुळे कुठेही खरचटलं किंवा छोटीशी जखम झाली आणि रक्त यायला लागलं की पहिली हळद त्यावर लावली जायची. त्यामुळे रक्त थांबायचं, जखम भरायची आणि कुठलंही इन्फ़ेक्शन देखील होत नसे. हिंग हा गॅसेस वर सगळ्यात चांगला समजला जातो. पूर्वी लहान मुलांना गॅस होऊन पोट जर फ़ुगलं तर पाण्यात हिंग मिक्स करून तो पोटावर लावला जायचा. अगदी मोठ्या माणसांनाही गॅसेस झाले तर ते जेवणाच्या शेवटी ताकाबरोबर हिंग घ्यायचे. गॅसेसमुळे होणार्या पोटदुखीवर ओवा सगळ्यात बेस्ट औषध. हे सगळे मसाल्याचे पदार्थ म्हणजे हळद, मोहरी इ. ड्राय़ वापरले जातात. पण आलं(जिंजर), लसूण(गार्लिक) ह्यासारखे पदार्थ वेट-ओले-फ़्रेश वापरले जातात. हळद कधी कधी ओलीही वापरली जाते पण त्याचं लोणचं इ. करून. आलं हे पचन-डायजेशन अतिशय चांगलं करणार आहे आणि हेच आलं सुकवून त्याच्यापासून जी सुंठ बनवली जाते ती तर अनेक रोगांवर रामबाण इलाज. म्हणजे जर आलं मिळाल नाही तरी सुंठीचा पर्याय कधीही मिळू शकणारा. 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मसाल्याच्या पदार्थांची झाड असतात. ह्यातलं आलं, हळद आणि लसूण हे पदार्थ जमिनीखाली मिळतात. थंडीच्या दिवसात लसूण तिच्या पानांसकट मिळते, पातीच्या कांद्यासारखी. काळीमिरी वेलावर लागते. तमालपत्र म्हणजे एका विशिष्ट झाडाची पानं-लिव्हज, दालचिनी म्हणजे त्याच झाडाची साल-बार्क.वेलची अगदी छोट्याशा झाडावर लागते. जायफ़ळ मोठ्या झाडाला लागतं आणि  जायफ़ळावर जी साल असते तिला जावित्री म्हणतात, तर लवंग म्हणजे  झाडाची कळी-बड, हिंग म्हणजे  झाडाच्या स्टेममधून बाहेर पडणारा एक प्रकारचा गोंद-रेझीन. मोहरीची झाडंही छॊटी असतात. सरसों नावाचा मोहरीसारखाच पदार्थ असतो आणि ह्या सरसोंच्या पानांची भाजी केली जाते त्याला  सरसों का साग म्हणतात. 
आता शेवटी थोडं महत्त्वाचं. ह्या थंडीच्या सीझनमध्ये वातावरणात खूप ड्रायनेस असतो त्यामुळे ह्या काळात शरीरातला ड्रायनेस वाढविणारे पदार्थ खाऊ नयेत. आहारातली कडधान्य शरीरात ड्रायनेस वाढवतात, म्हणून त्यांचा वापर टाळावा. "श्रीवर्धमान व्रताधिराज”च्या नऊ अंगांपैकी एक अंग आहारासंबंधी आहे आणि त्यात आहाराबद्दल विशेषरूपाने सांगण्यात आलेलं आहे. ह्या सीझनमध्ये तिळाचं तेल सगळ्यात बेस्ट- खाण्यासाठी आणि शरीरावर लावण्यासाठीही. आज आपण अनेक प्रकारची तेल वापरतो पण आयुर्वेदात वर्णन येतं की जे तिळापासून काढलं जातं त्यालाचं "तेल’’-ऑईल म्हणतात. तिळाच तेल सगळ्या प्रकारच्या तेलांमध्ये स्निग्ध आहे. थंडीतल्या ड्रायनेसवर सगळ्यात चांगला उपाय. "श्रीवर्धमान व्रताधिराज”चं एक अंग तिळाच्या तेलाच्या वापराविषयी आहे. अर्थात उपासना हे ह्या व्रताचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळे "श्रीवर्धमान व्रताधिराज” म्हणजे माणसांच्या मेंटल आणि फ़िजिकल दोन्ही प्रकारच्या हेल्थची सर्वोत्तम काळजी घेणारं. 
सो, आजसाठी एवढंच. आता बहुतेक आपली भेट न्यू इयरमध्येच. सो, हॅपी न्यू इयर टू ऑल इन अ‍ॅडवान्स.

Tuesday, December 7, 2010

मन

ॐ 
७-१२-२०१० 

मन
रविवारी घरात आवराआवरी करताना अचानकपणे जुने फ़ोटो सापडले. अगदी कॉलेजच्या काळापासूनचे. कॉलेजच्या आय.डी कार्डवर लावलेलेही, घरातल्या वेगवेगळ्या समारंभांचे. सॉलिड मजा वाटली ते फ़ोटो बघताना आणि त्यातल्या ब-याचश्या फ़ोटोतले प्रसंग, ती स्थळ, वेगवेगळी माणसं अगदी काल परवा पाहिल्यासारखी आठवली. खूपच गंमत वाटली आणि स्वत:च्या मेमरीची पण मजा वाटली. कधी कधी १०-१५मिनिटांपूर्वी घडलेली एखादी गोष्ट लक्षात राहत नाही आणि ते फ़ोटो बघितल्यानंतर त्यातली किती तरी ठिकाण अगदी कालच बघितली असावीत अशी स्पष्ट आठवली. मलाच माझी मोठी गंमत वाटली आणि परत एकदा मानवी मनाची ताकद प्रत्ययाला आली. आपण मागच्याच पोस्टमध्ये मनाबद्दल बोललो होतो. खरच माणसाचं मन कसं आहे हे आपल्याला कळायला खूप अवघड आहे. आपण आपल्या घरात बसून मनाने जगात कुठेही फ़िरून येऊ शकतो, आहे की नाही ग्रेट गोष्ट. जे कधी घडू शकणार नाही अशी कल्पनाचित्र पण आपलं मनच रंगवत असतं. मनाने एका क्षणात भूतकाळात जातो आणि तितक्याच सहजपणे आपलं मन आपल्याला भविष्याची स्वप्नही दाखवतं.
म्हटलं तर मनाची ताकद किती सॊलिड आहे नाही का? म्हणूनच ती आपल्याला योग्य दिशेने वापरता यायला हवी. कारण मन जेवढे चांगले विचार करतं तेवढेच वाईट विचारही करू शकतं आणि करतंही. म्हणूनच मराठीत म्हटल जातं की मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे आपलं स्वत:च मन जितक्या टोकाचा वाईट विचार स्वत:साठी करू शकतं तितका कदाचित आपला एखादा शत्रुही करणार नाही.
तर आज परत एकदा मनाचंच पुराण. आज मनाविषयी दुसरा महत्त्वाचा मुद्दा. शास्त्रात म्हटलं आहे की मन हे अन्नमय असतं. आपण मागेच म्हटलं की मन डोळ्यांनी दिसत नाही पण त्याचं काम तर दिसतं मग जसं शरीराचं पोषण होतं तर मग शरीरातल्या ह्या अवयवाचं पोषण होतं असणारचं. मनाचं पोषणही शरीराप्रमाणेच आपण जे काही खातो, त्यापासूनच होतं.  म्हणूनच मग सात्त्विक अन्न खा, असं आपल्याला सांगितलं जातं. आज काल नेमकं काय खायचं हा प्रश्न हा ब-याच जणांना पडलेला असतो. त्यातून मग वेगवेगळी पुस्तकं, इन्फ़र्मेशन देणारी मटेरियल्स वाचली जातात, जी आहाराशी संबंधित असतात.
ह्या संदर्भात एक गोष्ट आठवली. फ़ार पूर्वीच्या काळी एक मोठे अध्यात्मातले अधिकारी व्यक्ती होते. पूर्णपणे संन्यस्त जीवन जगणारे. कशाचाही मोह, राग, लोभ, खेद नसणारे. ते एका गावात एका घरी जेवायला गेले आणि जेवल्यानंतर त्यांच्या मनात चक्क चोरीचे विचार यायला लागले. अशक्यप्राय अशा ह्या घटनेचा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना असं कळलं की त्यांना जेवण घालणार्या व्यक्तीने त्याचा सगळा पैसा चोरीमारी करून मिळवला होता आणि आता त्यातून श्रीमंत होऊन तो दानधर्म करत होता. अर्थातच त्या संन्यस्त व्यक्तिमत्त्वाला ह्या अन्नातून जे काही दोष लागायचे ते लागलेचं कारण त्यांच मनच इतकं निर्मळ झालेलं होतं की अनुचित मार्गाने मिळवलेल्या पैशाने तयार केलं गेलेलं अन्न खाताच त्यांच्या मनावर परिणाम होऊन कधी मनाला शिवलेही नसतील असे चोरीचे विचार त्यांच्या मनात यायला लागले. तात्पर्य, माणूस जे काही खातो त्याचा त्याच्या मनावर परिणाम हा होतोच. म्हणूनच मग ज्या दिवशी बराच वेळ जप करायचा असतो अशा वेळी मन चंचल करणार्या कांदा, लसूण ह्यासारख्या गोष्टी खाऊ नयेत म्हणून सांगितल जातं. कांदा आणि लसूण दोन्ही गोष्टी मनाला  चंचल करतात त्यामुळे जपात मन स्थिर होऊ शकत नाही.
आता तरी परत प्रश्न राहिलाच की काय खायचं आणि काय खायचं नाही हा. हा प्रश्न श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराजाने अगदी सजपणे सोडवलेला आहे. सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी लिहिलेल्या ह्या ग्रंथात त्यांनी आहारातल्या कोणत्या अन्नपदार्थाचे काय गुण आहेत ते सांगितलेले आहेत आणि त्यावरून कोणीही सहजपणे काय खायचं आणि काय नाही ह्याचा निर्णय घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथराज तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, ह्याचा निर्णय कसा करायचा थोडक्यात स्वत:च व्यक्तिमत्व ओळखायला मदत करतो आणि आपलं व्यक्तिमत्व सगळ्यात बेस्ट व्हावं म्हणून आहार, विहार इ. त काय बदल करायचे ते सांगतो.
कारण जोपर्यंत आपल्या मनात बदल घडत नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही. कारण शास्त्रातचं सांगितलेलं आहे की मानवाच्या पुन्हा पुन्हा जन्म घेण्याला किंवा मुक्तीला मनच कारणीभूत असतं.

Saturday, November 20, 2010

मन:सामर्थ्यदाता

२०-११-२०१०
मन:सामर्थ्यदाता

खूप दिवसांनंतर परत एक नवीन पोस्ट. आजची ही पोस्ट मन:सामर्थ्यदाता सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणी समर्पित. उद्या त्रिपुरारि पौर्णिमा बापूंचा जन्मदिवस.
आज आपण मागे बोलायच्या राहिलेल्या विषयावर बोलूया. मन. प्रत्येक माणसाला एक मन असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्या मनावर आजपर्यंत सगळीकडे एवढं लिहिलं गेलयं की मन हा अभ्यासाचा आणि ट्रीटमेंटचा विषय आहे, हे मला देखील आयुर्वेद शिकायला लागेपर्यंत माहीत नव्हतं. आयुर्वेद शिकताना आम्हाला फ़र्स्ट इयरला एक सब्जेक्ट असायचा. त्या सब्जेक्टचं नाव, पदार्थविज्ञान. सुरुवातीला तो विषय खूप कठीण आणि बोअर वाटायचा, पण कळायला लागल्यावर तो इंटरेस्टींग वाटायला लागला. ह्यात मन, मनाची डेफ़िनेशन, त्याचं काम कस चालतं ह्या सगळ्याचं वर्णन होतं. 
आपलं मन हे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही करतो ते करायला मदत करतं. म्हणजे कसं तर आपण जेवतो, बोलतो, खातो, हसतो, वाचतो ह्या सगळ्याच्या सगळ्या क्रियांसाठी मनाचा प्रेझेंस आवश्यक असतो. तसचं आपल्याला जे काही नॉलेज होतं त्यासाठी मनच त्या त्या अवयवाशी संयुक्त व्हावं लागतं.
कोणताही माणूस असो प्रत्येकाच्या शरीरात फ़क्त एकच मन असतं आणि ते अणू म्हणजे अ‍ॅटम एवढं असतं. पण हे मन शरीरात काम कसं करतं हे माहीत करून घेण्यासारखं आहे. 
समजा आपण एखादं वेळी टि.व्ही. बघत असतानाच पेपर वाचतो त्याचवेळी कोणाशी तरी बोलतोही आणि खातो सुद्धा. सांगायचा मुद्दा की आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करतो आणि त्या करता प्रत्येक क्रियेत मनाचा प्रेझेंस असतोच, मग हे कसं घडतं. ह्याच्या एक्सप्लनेशनसाठी आयुर्वेदात एक उदाहरण दिलं जातं.  
समजा एक फ़ुल घेतलं आणि त्याच्या सगळ्यात बाहेरच्या पाकळीला सुई टोचली आणि ती पार शेवटच्या पाकळीपर्यंत नेली तर आपल्याला सगळ्याच पाकळ्या पिअर्स झालेल्या म्हणजे सुईने टोचल्या गेलेल्या दिसतात. ह्यावरून असं वाटतं की सगळ्या पाकळ्या एकाच वेळी पिअर्स झाल्या असाव्यात पण तसं नसतं एकामागोमाग एक अशा लाईनने त्या पाकळ्या पिअर्स होत जातात, पण बघितल्यावर सगळ्या पाकळ्या एकदमच पिअर्स झाल्यासारख्या वाटतात. एक्झॅक्टली अशाच प्रकारे माणसाचं मन काम करतं. ते फ़्रॅक्शन ऑफ़ सेकंदात प्रत्येक अवयवाशी कनेक्ट होत आणि त्याची क्रिया घडवून आणतं. नाही तर विचार करा जेवत असताना ते फ़क्त जेवणाच्या क्रियेवर कॉन्सन्ट्रेट करेल तेव्हा बघण्याची क्रिया किंवा दुसरी कुठलीही अ‍ॅक्शन बंद. विचार करा काय प्रॉब्लेम होईल आणि सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कामं संपणारच नाहीत. ही वेल ऑरगनाईज सिस्टीम आपल्या शरीरात कंडक्ट करणार्या भगवंताला आपण खरंच धन्यवाद द्यायला हवेत.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन कायम शरीरात प्रेझेंट असतं. अगदी आपण झोपेत असताना सुद्धा. मात्र कधी कधी ते झोपेतही अ‍ॅक्टीव असतं आणि मग माणसाला स्वप्न पडतात,असं आयुर्वेद सांगतो. तर महत्त्वाची गोष्ट ही की आजपर्यंत कोणालाही माणसाच्या शरीरातलं मन दाखवता आलेलं नाही आणि कुठल्याही टेस्ट इ.नी दिसलेलंही नाही. कुठल्याही मेडीकल ब्रान्चच्या स्टुडंटना अगदी सुरुवातीलाच शरीरातले टिश्युजपासून अगदी ब्रेनपर्यंतचे अवयव दाखवले जातात पण तिथेही मन दाखवता येत नाही. कारण आयुर्वेद म्हणतो की मनाचा प्रेझेंस अनुमानाने ओळखला जातो आणि ह्या जगात अनुमान करून जाणल्या जाणार्या असंख्य गोष्टी आहेत. साधीच गोष्ट बघा ना, आपण जी ब्लड टेस्ट करतो ती करण्यासाठी आपल्या शरीरातलं फ़क्त थोडंसं ब्लड घेतलं जातं आणि त्यावरून संपूर्ण शरीरातल्या ब्लडची कंडीशन काय आहे हे पाहीलं जातं . 
तर असं हे माणसाचं मन, काम करणार पण कधीच दिसून न येणारं. 
आयुर्वेद म्हणतो की माणसाला निरोगी राहण्यासाठी आणि रोगाचा मुकाबला करण्यासाठी मनाची स्ट्रेन्थ-सामर्थ्य आवश्यक आहे. ही मनाची स्ट्रेन्थ औषधापेक्षाही नामस्मरण, उपासना ह्यासारख्या गोष्टींतून मिळते. सध्याच्या काळात तर प्रत्येकाच्या मनाला अनेक आघाड्यांवर लढण्यासाठी सामर्थ्याची नितांत गरज आहे कारण सध्या प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या स्ट्रेस नाही तर भीती खाली वावरतो आहे आणि म्हणूनच एकमात्र भगवंताची-सद्‍गुरुंची भक्ती ही गोष्टच माणसाच्या मनाला सामर्थ्य देणारी आहे आणि ह्याचा अनुभव आजपर्यंत असंख्य लोकांनी घेतलेला आहे; कारण जो भक्ती करतो तोच निर्भय राहू शकतो.

Thursday, November 4, 2010

अभ्यंगस्नान

ॐ 
०४-११-२०१०
 अभ्यंगस्नान

दिवाळीचा पहिला दिवस. पहाटे पहाटे उठायचं. सगळीकडून फ़टाक्यांचे आवाज यायचे. थंडीही चांगलीच असायची. दारासमोरचा कंदील, अंगणात काढलेली रांगोळी आणि  घरात सगळ्यांची अभ्यंगस्नानासाठी चाललेली लगबग. पाट, त्याभोवती रांगोळी, दुधात भिजवलेल्या उटण्याचा सुगंध. मग प्रत्येकाच्या आंघोळीच्या वेळी लावले जाणारे फ़टाके आणि नंतर नवे कपडे घालून देवाला नमस्कार करून, फ़राळाचा नैवेद्य देवाला अर्पण करून, घरातल्या वडीलधार्यांना नमस्कार करून मग  केला जाणारा फ़राळ. आमच्या लहानपणची दिवाळी अशीच काहीशी असायची.
नरकचतुर्दशी, दिवाळीचा पहिला दिवस. नरकासुराचा वध केला तो दिवस. पूर्वी पहाटे पहाटे रेडियोवर नरकासुराच्या वधाचं कीर्तन लागायचं आणि मंगलमय वातावरणात सुरू झालेली ही दिवाळी कधी तीन तर कधी चार दिवसांपर्यंत चालायची. 
दिवाळीची सुरुवात व्हायची ती अभ्यंगस्नानाने. अंगाला तेल लावलं जायचं आणि मग त्यावर दुधात भिजवलेलं उटणं संपूर्ण अंगाला लावलं जायचं. आयुर्वेदात खरं तर हे अभ्यंग रोजच्या रोज करावं असं सांगितलेलं आहे. आपण रोज संपूर्ण दिवसात काय काय करायला हवं म्हणजे आपलं आरोग्य टिकवण्यासाठी काय काय करायला हवं, हे सांगण्यासाठी आयुर्वेदाने  दिनचर्या म्हणजे संपूर्ण दिवसात काय करावं ते सांगितलेलं आहे. ह्या दिनचर्येची सुरुवातच उठण्यापासून होते. उठल्यानंतर दात कशाने घासावेत इथपासून सगळ्या गोष्टी सविस्तर आणि सकारण सांगितलेल्या आहेत. मजा माहितेय का, जेव्हा टूथब्रशचा शोधही लागला नव्हता तेव्हा बाभूळ, कडुनिंब, खैर, करंज ह्या वनस्पतींच्या ट्विग्ज दात घासण्यासाठी वापरल्या जायच्या आणि त्रिकटु म्हणजे सुंठ, मिरी व पिंपळी ह्यांच सारख्या प्रमाणात एकत्र चूर्ण थोड्याशा मधात मिक्स करून दात घासण्यासाठी वापरलं जायचं. काही वर्षापूर्वीपर्यंत बरेच लोक दात घासण्यासाठी बाभळीच्या ट्विग्ज वापरतही होते, पण आता त्या फ़ारशा कुठे दिसत नाहीत. ह्याचा मुख्य फ़ायदा म्हणजे ह्याने दात  आणि हिरड्या चांगल्या मजबूत व्हायच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे दात किडण्यापासूनही बचाव व्हायचा. कारण बाभूळ दात आणि हिरड्या दोन्हीला चांगला बळकट करणारा, कडुनिंब दाताला कीड लागण्यापासून रोखणारा, खैर आणि करंजही हेच काम करणारे.   
आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी जे अभ्यंगस्नान करतो, त्यातलं अभ्यंग आणि स्नान हे दोन्ही  ह्या दिनचर्येत सांगितलेले आहेत.
अभ्यंग म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावणे, थोडक्यात तेलाने मालीश करणे आणि त्यानंतर उदवर्तन म्हणजे उटणे लावणे. अर्थातच आधी अभ्यंग आणि मग उदवर्तन हाच क्रम. हे अभ्यंग का करायचं? ह्याचं कारणही आयुर्वेदाने खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. आपल्या शरीराच्या त्वचेत आपल्या नर्व्हज असतात आणि ह्याच नर्व्हजमार्फ़त ब्रेनपर्यंत सेन्सेशन पोचवले जाते. आयुर्वेदानुसार हे काम वायु म्हणजेच शरीरात राहणार्या वात ह्या दोषाचे आहे. मग हे काम नीट होण्यासाठी नर्व्हज आणि मुख्य म्हणजे शरीरातला वात दोष व्यवस्थित रहायला हवा. तो तसा राहण्यासाठी तेलाने केलेल्या अभ्यंगाची फ़ार मदत होते कारण तेल हे शरीरातल्या वातावर काम करणार अत्यंत गुणकारी औषध आहे. अभ्यंगानंतर उदवर्तन केलं जातं म्हणजेच उटणं लावलं जातं. ह्यामुळे स्किनवर जी पोअर्स असतात, ज्यातून आपला घाम बाहेर पडतो, ती पोअर्स क्लिन व्हायला मदत होते. कारण ही पोअर्स क्लिन झाल्यानेच शरीरातला स्वेट म्हणजे घाम योग्य प्रकारे बाहेर टाकला जातो. कारण घामावाटे शरीरातले अनेक अनावश्यक घटक बाहेर टाकले जात असतात. मात्र उटणं लावताना नेहमी एक गोष्ट लक्शात ठेवायला हवी की त्वचेवर नेहमी वरच्या दिशेने उटणं लावायला हवं म्हणजेचं त्वचेवरच्या केसांची जी डिरेक्शन आहे त्याच्या अपोझिट- अपवर्ड डिरेक्शनमध्ये उटणं लावायला हवं. 
आता ह्याचे फ़ायदे आपण वर बघितलेच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामुळे स्किनचं सौंदर्य वाढायला मदत होते. 
खरं तर असं अभ्यंग रोजच करायला हवं. पण आपण हल्ली निदान दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरी आठवणीने अभ्यंगस्नान करतो. 
आज आपल्याला मन, आत्मा सारख्या विषयांवर आयुर्वेदाचं मत बघायचं होतं. पण अभ्यंगाच्या विषयात तो मुद्दा मागेच राहिला. पण मनाचा आणि ह्या अभ्यंगाचंही परस्परांशी रिलेशन आहे आणि ते म्हणजे अभ्यंग आपल्या मनालाही प्रसन्न करतं. खरं तर मन ह्या विषयावर एवढं काही बोलण्यासारखं आहे की ते आपण सविस्तरच पाहू. मनाबद्दल अगदी सोप्या भाषेत, प्रत्येकाला कळेल अशा पद्धतीने बापूंनी ग्रंथराजाच्या प्रेमप्रवास खंडात सांगितलेलं आहे. खर सांगायच तर ज्यांना आयुर्वेद माहीत आहे किंवा जे आयुर्वेद शिकलेले आहेत त्यांच्यासाठी हा ग्रंथराज म्हणजे माहितीचा खजिना आहे. कारण आयुर्वेदातले अनेक कन्सेप्टस ह्यात बापूंनी अगदी प्रत्येकासाठी अतिशय सोपे करून सांगितलेले आहेत. हा माझा स्वत:चा अनुभव आहे.  
तर मन ह्या विषयावर आपण पुढल्या पोस्टमध्ये नक्की बोलू. 
आज दिवाळीच्या शुभेच्छा देऊन इथेच निरोप घेऊया.



Friday, October 22, 2010

वैद्यानां शारदि माता

22-10-2010
वैद्यानां शारदि माता।

जीवेत्‌शरद: शतम्‌। अशा प्रकारे एखाद्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे अभिष्टचिंतन (त्याला विश करण्याची) करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. ह्याचा अर्थ त्या व्यक्तीने 100 शरद ऋतु पहावेत थोडक्यात उसकी उमर बहुत लंबी हो. परवाच याचा रेफरन्स कोणाला तरी हवा होता, त्यावेळी अचानक ह्या ओळीची आठवण झाली आणि त्याच बरोबर ही वर लिहिलेली दुसरी ओळही आठवली.
खरं तर ह्या वर लिहिलेल्या ओळीचा अर्थ असा आहे की शरद ऋतु हा वैद्यांसाठी म्हणजेच डॉक्टरांसाठी आईसारखा आहे. आयुर्वेदात डॉक्टसर्र्ना वैद्य असं म्हटल जात. आयुर्वेदाला जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा कॉलेजमध्ये टिचर्सच्या नावापुढे वैद्य किंवा वैद्या असं लिहिलेय असायचं आणि आपल्याला जेव्हा डीग"ी मिळेल तेव्हा आपल्याही नावापुढे अशीच डीग"ी लागेल ह्याचा आनंद व्हायचा. तर वैद्यांसाठी म्हणजेच डॉक्टर्ससाठी हा शरद ऋतु फार फायद्याचा आहे असं म्हटलं जातं. त्याचं पहिलं कारण म्हणजे त्या वेळी बरेच आजार एकदम डोकं वर काढतात कारण सिंपल वातावरणातला बदल. पावसाळा संपून एकदम ऑक्टोबर हिट सुरू होते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या काळात वैद्यांना भरपूर औषधी वनस्पती मिळायच्या. कारण पावसाळ्यात अनेक वनस्पती उगवायच्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यातल्या काही वनस्पती अगदी थोेड्या दिवसांसाठीच जिवंत रहायच्या आणि नंतर नष्ट व्हायच्या. एक उदाहरण सांगायच तर एक भुई आवळा नावाची वनस्पती असते, जी अगदी थोड्या दिवसांसाठीच उगवते आणि नंतर नष्ट होते, ही वनस्पती अगदी छोटीशी असते. अजूनही कधी तरी रस्त्याच्या कडेला ही वनस्पती सापडते. आपण च्यवनप्राशचं नाव ऐकलच असेल. त्यातला महत्त्वाचा इनग"ेडीयन्ट असतो आवळा. पण ह्या भुई आवळा आणि च्यवनप्राशमध्ये वापरला जाणारा आवळा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. आपल्याकड जनरलीे दोन प्रकारचे आवळे मिळतात. एक छोटे जे जनरली चिंचा, बोरांच्या गाड्यांवर मिळतात, हे खूपच आंबट असतात. च्यवनप्राशसाठी मोठे आवळे वापरले जातात, जे खाल्यावर पाणी प्यायलं की एकदम गोड चव लागते. तर हे जे आवळ्याच झाड असतं ते ह्या ऋतुत वाढायला लागतं म्हणजे इतका वेळ असतं कुठे, असं तुम्हाला वाटेल, पण जेव्हा उन्हाळ्याचा सीझन सुरू होतो म्हणजे एप्रिल-मे तेव्हा हे झाड डॉर्मन्ट स्टेजमध्ये जातं म्हणजे अक्षरश: भूमिगत होत म्हणजे त्याची पानं, फुलं, फळं काहीच जमिनीवर दिसत नाही, फक्त त्याचं मूळ तेवढं जमिनीत राहतं आणि पाऊस पडून गेल्यावर परत एकदा त्याला पान फुटून ते जमिनीवर वाढायला लागतं. तर सांगायचा मुद्दा हा की पावसाळा संपल्यावर अशा असं"य वनस्पती अगदी थोड्या काळासाठी उगवतात. मग त्यांच कलेक्शन ह्याच काळात करून ठेवावं लागतं आणि मग त्यापासून औषध बनवून किंवा सुकवून ठेवून त्या वर्षभर म्हणजे पुन्हा त्यांचा सीझन येईपर्यंत वापराव्या लागतात. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे पूर्वी हे जे वैद्य म्हणजे आयुर्वेदाचे डॉक्टर्स होते ते स्वत: जाऊन ही औषधं तोडून आणायचे, स्वत: त्यापासून वेगवेगळी औषध बनवायचे आणि पेशंटला द्यायचे. आज काल केमिस्टच्या दुकानात गेलं की लगेचच कुठलंही औषध आपल्याला मिळतं आणि समजा एखादं औषध आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला अगदी चुकचुकल्यासारखं होत. मग पूर्वीच्या काळी जेव्हा औषध सगळ्यात आधी जाऊन शोधून आणा म्हणजे पहिल्यांदा ते औषध म्हणजे ती वनस्पती ओळखता यायला हवी, कारण एक सार"या दिसणाऱ्या अनेक वनस्पती असतात किंवा एकाच वनस्पतीचे अनेक टाइप्सही असतात फॉर एक्झाम्पल काही काही वनस्पतीचे लाल फुल येणारी, निळी फुलं येणारी, पांढरी फुलं येणारी असे प्रकार असतात आणि आपण जेव्हा वनस्पती तोडायला जाणार तेव्हा त्याला फुलं आलेली नसतील तर मग त्यातून आपल्याला हवी तीच वनस्पती तोडून आणायची  हे खूपच कठीण काम. मग ती आणून त्याच्यापासून औषध बनवायची आणि ती प्रिझर्व करून ठेवायची. विचार केला तर हे खूपच कठीण काम. पण हे सगळं केलं जायचं आणि शिष्यांनाही शिकवलं जायचं. अजूनही आयुर्वेदात वनस्पतींपासून औषधं बनवली जातात, पण आज काल बऱ्याच ठिकाणी  त्यासाठी स्पेशली ह्या वनस्पतींची लागवड केली जाते.
आयुर्वेदात आम्हाला आत्मा, मन, पंचमहाभूतं अशा वेगवेगळ्या संकल्पना अगदी फर्स्ट इयरलाच अभ्यासाला असायच्या. तेव्हा आम्हाला वाटायचं की डॉक्टर होण्याचा आणि ह्याचा काय संबंध? पण आता मला कळतय की डॉक्टरांना ह्या संकल्पना स्पष्ट झाल्या तर त्यांना प्रॅक्टीसमध्ये खूप फायदा होतो आणि जेव्हा एका जिवंत माणसाची ट्रीटमेंट केली जाते आणि जीवन-मरण अशा गोष्टीशी संबंध येतो, तेव्हा खरंच सद्‌गुरु-भगवंताचं महत्त्व आपोआप कळतं. सो, नेक्स्ट टाइम, लेट्‌स टॉक समथिंग अबाऊट मन, आत्मा इत्यादि.          

Saturday, October 9, 2010

अंक दुसरा


अंक दुसरा     9-9-2010 शनिवार
     नवरात्रीच्या सुरुवातीला सर्वप्रथम आदिमातेच्या स्मरणाने सुरुवात करूया. नमश्चण्डिकायै।
सप्टेंबर महिन्यात ब्लॉग सुरू केल्यानंतर फक्त एक पोस्ट लिहिली आणि त्यानंतर मध्ये बराच मोठा पिरीयड गेला. पण सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या एका नव्या माध्यमातून सगळ्यांशी जोडलं जाण्याचा आनंद. आज काल प्रत्येकासाठी वेळ ही अतिशय महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, त्यामुळे एकमेकांशी संवाद साधायची इच्छा असूनही ते साधत नाही. त्यामुळे ब्लॉगसारख्या माध्यमामुळे आता ही गोष्ट सोपी झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी दिलेल्या रिस्पॉन्समुळे लिहिण्याचा उत्साह खरोखरच वाढला.
आता दुसरी पोस्ट ब्लॉगवर टाकायला उशीर झाला कारण, कारणही तसंच महत्त्वाचं होतं. साईनिवासमध्ये शूटिंग चाललेलं होतं आणि त्यात बिझी असल्यामुळे दुसरी पोस्ट फारच उशिराने लिहिली गेली.
     सगळ्यात आधी साईनिवास म्हणजे नेमकं काय, ते कुठे आहे, ह्याची थोडक्यात कल्पना द्यावीशी वाटते. साईनिवास म्हणजे साईबाबाचं चरित्र ज्यांनी लिहिलं, त्या हेमाडपंतांचं म्हणजेच श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकरांचं घर. आता तिथे त्यांचे नातू आणि त्यांची फॅमिली असे सगळे जण राहतात. थोडक्यात हेमाडपंतांची 3-4 आणि 5वी पिढी आज ह्या घरात राहते आहे.
     ज्यांनी शूटिंग बघितलेलं आहे किंवा शूटिंगचा अनुभव घेतलेला आहे, त्यांना पडद्यावर दिसणाऱ्या सिरीयल्स, जाहिराती किंवा पिक्चर्स मागच्या श्रमांची पूर्ण कल्पना आणि जाणीव असतेच. अक्षरश: एकेका प्रसंगामागे अनेक लोकांची मेहनत असते,वेळ असतो आणि ही गोष्ट मी स्वत: अनुभवली. पण बाकी एकंदरीत शूटिंग वॉज ग्रेट एक्सपिरीयन्स.
खरं तर साईनिवासबद्दल पूर्वी काहीच माहिती नव्हती. पण एक दिवस अचानक साईनिवासबद्दल माहिती मिळाली, तिथे जाणं झालं आणि तिथूनच खरं तर आयुष्याला कलाटणी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कारण इथेच सगळ्यात आधी बापुंविषयी, त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. बापु म्हणजे डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी. माझे सद्गुरु. हे स्वत: एम.डी.(मेडीसीन) आहेत. मागच्या ब्लॉगमध्ये "अनिरुद्धाज ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट'चा उल्लेख केला होता. ही संस्था डिझास्टरशी संबंधित गोष्टींचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ही संस्था आणि अशा अनेक संस्था आज बापुंच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत. ज्याविषयी आपण पुढे कधीतरी सविस्तर बोलूच.
शूटिंगच्या दरम्यान एक गोष्ट ठळकपणे जाणवली की आजच्या काळात टेक्नॉलॉजी किती प्रगत झाली आहे. प्रत्येक सेक्टरसाठी ही प्रगत टेक्नॉलॉजी खूपच फायद्याची ठरत आहे. अगदी आयुर्वेदासारख्या प्राचीनतम म्हणून गणल्या जाणाऱ्या वैद्यकशास्त्रानेही आज कॉम्प्युटरसारख्या टेक्नॉलॉजीशी दोस्ती केलेली आहे. पूर्वीच्या काळी गुरु-शिष्य परंपरेने आयुर्वेद शिकवला जायचा आणि  आयुर्वेदाचं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवले जाई. नंतर ते ग्रंथस्वरूपात म्हणजेच लिखित स्वरूपात उपलब्ध व्हायला लागलं. आज आपण आयुर्वेदाची औषध फक्त माणसांसाठी वापरली जात असल्याची पाहतो; पण एक काळ असा होता की हत्ती, घोडे ह्यांच्यासारखे प्राणी आणि वनस्पती म्हणजे झाडांनाही आयुर्वेदाची औषध दिली जायची. वाचून कदाचित आश्चर्य वाटलं असेल पण त्या काळी हत्तींसाठी म्हणून हस्ति-आयुर्वेद, झाडांसाठी वृक्ष-आयुर्वेद आणि घोड्यांसाठी अश्व-आयुर्वेद अशा वेगवेगळ्या ब्रान्चेस होत्या. आज हे ज्ञान उपलब्ध आहे किंवा नाही आणि वापरलं जात आहे किंवा नाही, हे काही माहित नाही.
आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र मला खरचं ग्रेट वाटतं. मी स्वत: आयुर्वेद शिकले किंवा त्यातली औषध वापरली म्हणून नव्हे तर आयुर्वेदातल्या डॉक्टर्सचा म्हणजे जे खरं तर त्या काळातले ऋषी, आचार्य . होते,त्यांचा रिसर्च बघितला तर त्यांच्या अथक परिश्रमांची कल्पना येते. जेव्हा इलेक्ट्रीसिटीही नव्हती तेव्हा आयुर्वेदातले सुश्रुत नावाचे आचार्य सर्जरी-ऑपरेशन्स करायचे. त्यांच्या ग्रंथामध्ये कॅटरॅक्ट-मोतीबिंदू, नाक, ओठ, कान ह्यांच्या सर्जरी कशा करायच्या ह्याचं वर्णन मिळतं, तसंच आज वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जशी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स्वापरली जातात, तशी त्या काळातल्या इन्स्ट्रुमेंट्स्ची ही माहिती ह्या सुश्रुतांनी त्यांच्या ग्रंथात दिली आहे. त्यांच्या स्टुडंटस्ना ते सर्जरी शिकवायला वेगवेगळे मातीचे पुतळे, चिंध्यांनी तयार केलेले माणसांचे पुतळे अशा अनेक गोष्टी वापरायचे. इज इट नॉट अमेझिंग?
आयुर्वेदात अशा बऱ्याच अमेझिंग गोष्टी आहेत आणि त्या सगळ्यांशी शेअर करायला मला नक्कीच आवडेल. तर मग आज ह्याच नोट वर निरोप घेऊ या.