Wednesday, July 6, 2011

आजीचा बटवा

                  

६-७-२०११
आजीचा बटवा
पूर्वीच्या काळी घराघरात हा आजीचा बटवा असायचा. आज काळाच्या ओघात हा आजीचा बटवा कुठल्या कुठे हरवला की काय असं वाटायला लागलं.
आजीचा बटवा- काही जणांना ही संकल्पना माहीतही असेल. आजीचा बटवा म्हणजे नेमकं कायं? पूर्वी घराघरात असलेल्या आज्यांकडे कुठल्याही किरकोळ-मायनर आजारावर घरातच असलेली अनेक औषध तयार असायची आणि ह्या सगळ्या औषधांचाच मिळून तयार व्हायचा आजीचा बटवा.
पाय मुरगळला लाव हळद आणि फ़टकी (तुरटी-अ‍ॅलम)चा लेप, कुठेही कापलं तर ताबडतोब त्यावर हळद चेपली जायची, घसा दुखत असेल तर डायरेक्ट अ‍ॅंटीबायोटीक्स न घेता गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या (गार्गलिंग) केल्या जायच्या. सर्दीवर पहिला उपाय असायचा सुंठ नाहीतर वेखंड उगाळून लावायचा. पोटात गॅसेस झाले असतील तर ओवा नाहीतर हिंगाचा वापर केला जायचा.
लहान मूल रात्री रडायला लागलं आणि त्याच्या पोटात गॅस झाल्याचा अंदाज आला तर थोडासा हिंग पाण्यात मिक्स करून तो पोटावर लावला जायचा.
ह्या आजीच्या बटव्यात रक्तचंदनाची बाहुली, चंदनाचं खोड, हळकुंड, सागरगोटा, मुरुडशेंग, तुरटी, वेखंड, सुंठ अशी अनेक औषधं असायची. ही सगळी औषध तसं बघायला गेलं तर अगदी सहज मिळणारी असायची, नाही तर घरात असायचीचं, त्यामुळे छॊट्या छोट्या आजारांवर सगळ्यात आधी ह्याच औषधांचा वापर केला जायचा. 

शरीरावर एखाद्या ठिकाणी आग-बर्निंग होत असेल तर त्यावर तूप लावलं जायचं. तुपाच्या थंडाव्यामुळे त्या जागेची आग कमी व्हायची. आयुर्वेदात ह्या तूपापासून तयार केलं जाणारं एक वैशिष्ट्यपूर्ण औषध आहे. शतधौत असं त्या तुपाला म्हटलं जातं कारण हे औषध तयार करताना खरोखरचं तूप शंभर वेळा पाण्याने धुतात. ह्यामुळे तूप अतिशय सॉफ़्ट होतं आणि अतिशय थंडही. त्यामुळे शरीराच्या कुठल्याही अवयवाचा दाह-बर्निंग होत असेल तर हे उत्तम औषध.
आवळा-ज्याला आयुर्वेदात आमलकी म्हणून नाव दिलेलं आहे. हा आवळा व्हिटॅमिन सी चा सगळ्यात मोठा सोर्स. ह्यातलं व्हिटॅमिन सी बराच मोठा काळपर्यंत टिकून राहतं आणि म्हणूनच आवळा ताजा(फ़्रेश) आणि वाळवून(ड्राय) दोन्ही प्रकारे वापरता येतो. ह्याला आयुर्वेद रसायन औषध म्हणतो. रसायन म्हणजे असं औषध जे वार्धक्यावस्था लवकर येऊ देत नाही- म्हणजे डीजनरेटीव चेंजेस लवकर होऊ देत नाही आणि एखाद्या आजारानंतर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवितो जेणे करून लवकर आजारपण येऊ नये.
आवळ्याप्रमाणेच गुळवेल, शतावरी, हिरडा अशा अनेक औषधी रसायन म्हणून सांगितल्या आहेत आणि त्या प्रत्येकापासून तयार करण्यात येणारी अनेक औषधं आयुर्वेदात वर्णन केलेली आहेत.
आजचा जमाना पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक समस्यांचा आहे. त्यामुळे माणसांची इम्युनिटी म्हणजे रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती खूपच कमी झाली आहे. त्यामुळे माणसं वर्षात अनेक वेळा आजारी पडतात. एकाच व्यक्तीला दोनदा-तीनदा मलेरियासारखा आजार झालेला आपण आजकाल पाहतो. मग अशावेळी ह्या आयुर्वेदातल्या औषधांचा कितपत उपयोग होईल असा प्रश्न पडू शकतो. पण ह्याचं उत्तर एकच असू शकतं की जे कोणी ह्याचा वापर करून बघतात तेच ह्या प्रश्नाचं उत्तर जाणू शकतात.
आयुर्वेदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आयुर्वेदाने निरोगी म्हणजेच रोग नसण्याची अवस्था सांगताना म्हटलं आहे की ज्याचं शरीर आणि मन दोन्ही रोगरहीत तोच खरा निरोगी. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आहार, व्यायाम अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत आणि आपण जे काही खातो त्यापासून मनालाही पोषण मिळतं आणि मनाला अधिकाधिक निरोगी म्हणजेच रोगरहीत ठेवण्यासाठी सद्‍गुरुंची भक्ती मदतीला येते. 
थोडक्यात काय ज्याचं शरीर आणि मन दोन्ही रोगरहीत तोच खरा निरोगी, नाही का?