ॐ
अंक दुसरा 9-9-2010 शनिवार
नवरात्रीच्या सुरुवातीला सर्वप्रथम आदिमातेच्या स्मरणाने सुरुवात करूया. ॐ नमश्चण्डिकायै।
सप्टेंबर महिन्यात ब्लॉग सुरू केल्यानंतर फक्त एक पोस्ट लिहिली आणि त्यानंतर मध्ये बराच मोठा पिरीयड गेला. पण सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या एका नव्या माध्यमातून सगळ्यांशी जोडलं जाण्याचा आनंद. आज काल प्रत्येकासाठी वेळ ही अतिशय महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, त्यामुळे एकमेकांशी संवाद साधायची इच्छा असूनही ते साधत नाही. त्यामुळे ब्लॉगसारख्या माध्यमामुळे आता ही गोष्ट सोपी झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी दिलेल्या रिस्पॉन्समुळे लिहिण्याचा उत्साह खरोखरच वाढला.
आता दुसरी पोस्ट ब्लॉगवर टाकायला उशीर झाला कारण, कारणही तसंच महत्त्वाचं होतं. साईनिवासमध्ये शूटिंग चाललेलं होतं आणि त्यात बिझी असल्यामुळे दुसरी पोस्ट फारच उशिराने लिहिली गेली.
सगळ्यात आधी साईनिवास म्हणजे नेमकं काय, ते कुठे आहे, ह्याची थोडक्यात कल्पना द्यावीशी वाटते. साईनिवास म्हणजे साईबाबाचं चरित्र ज्यांनी लिहिलं, त्या हेमाडपंतांचं म्हणजेच श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकरांचं घर. आता तिथे त्यांचे नातू आणि त्यांची फॅमिली असे सगळे जण राहतात. थोडक्यात हेमाडपंतांची 3-4 आणि 5वी पिढी आज ह्या घरात राहते आहे.
ज्यांनी शूटिंग बघितलेलं आहे किंवा शूटिंगचा अनुभव घेतलेला आहे, त्यांना पडद्यावर दिसणाऱ्या सिरीयल्स, जाहिराती किंवा पिक्चर्स मागच्या श्रमांची पूर्ण कल्पना आणि जाणीव असतेच. अक्षरश: एकेका प्रसंगामागे अनेक लोकांची मेहनत असते,वेळ असतो आणि ही गोष्ट मी स्वत: अनुभवली. पण बाकी एकंदरीत शूटिंग वॉज ए ग्रेट एक्सपिरीयन्स.
खरं तर साईनिवासबद्दल पूर्वी काहीच माहिती नव्हती. पण एक दिवस अचानक साईनिवासबद्दल माहिती मिळाली, तिथे जाणं झालं आणि तिथूनच खरं तर आयुष्याला कलाटणी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कारण इथेच सगळ्यात आधी बापुंविषयी, त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. बापु म्हणजे डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी. माझे सद्गुरु. हे स्वत: एम.डी.(मेडीसीन) आहेत. मागच्या ब्लॉगमध्ये "अनिरुद्धाज ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट'चा उल्लेख केला होता. ही संस्था डिझास्टरशी संबंधित गोष्टींचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ही संस्था आणि अशा अनेक संस्था आज बापुंच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत. ज्याविषयी आपण पुढे कधीतरी सविस्तर बोलूच.
शूटिंगच्या दरम्यान एक गोष्ट ठळकपणे जाणवली की आजच्या काळात टेक्नॉलॉजी किती प्रगत झाली आहे. प्रत्येक सेक्टरसाठी ही प्रगत टेक्नॉलॉजी खूपच फायद्याची ठरत आहे. अगदी आयुर्वेदासारख्या प्राचीनतम म्हणून गणल्या जाणाऱ्या वैद्यकशास्त्रानेही आज कॉम्प्युटरसारख्या टेक्नॉलॉजीशी दोस्ती केलेली आहे. पूर्वीच्या काळी गुरु-शिष्य परंपरेने आयुर्वेद शिकवला जायचा आणि आयुर्वेदाचं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवले जाई. नंतर ते ग्रंथस्वरूपात म्हणजेच लिखित स्वरूपात उपलब्ध व्हायला लागलं. आज आपण आयुर्वेदाची औषध फक्त माणसांसाठी वापरली जात असल्याची पाहतो; पण एक काळ असा होता की हत्ती, घोडे ह्यांच्यासारखे प्राणी आणि वनस्पती म्हणजे झाडांनाही आयुर्वेदाची औषध दिली जायची. वाचून कदाचित आश्चर्य वाटलं असेल पण त्या काळी हत्तींसाठी म्हणून हस्ति-आयुर्वेद, झाडांसाठी वृक्ष-आयुर्वेद आणि घोड्यांसाठी अश्व-आयुर्वेद अशा वेगवेगळ्या ब्रान्चेस होत्या. आज हे ज्ञान उपलब्ध आहे किंवा नाही आणि वापरलं जात आहे किंवा नाही, हे काही माहित नाही.
आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र मला खरचं ग्रेट वाटतं. मी स्वत: आयुर्वेद शिकले किंवा त्यातली औषध वापरली म्हणून नव्हे तर आयुर्वेदातल्या डॉक्टर्सचा म्हणजे जे खरं तर त्या काळातले ऋषी, आचार्य इ. होते,त्यांचा रिसर्च बघितला तर त्यांच्या अथक परिश्रमांची कल्पना येते. जेव्हा इलेक्ट्रीसिटीही नव्हती तेव्हा आयुर्वेदातले सुश्रुत नावाचे आचार्य सर्जरी-ऑपरेशन्स करायचे. त्यांच्या ग्रंथामध्ये कॅटरॅक्ट-मोतीबिंदू, नाक, ओठ, कान ह्यांच्या सर्जरी कशा करायच्या ह्याचं वर्णन मिळतं, तसंच आज वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जशी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स्वापरली जातात, तशी त्या काळातल्या इन्स्ट्रुमेंट्स्ची ही माहिती ह्या सुश्रुतांनी त्यांच्या ग्रंथात दिली आहे. त्यांच्या स्टुडंटस्ना ते सर्जरी शिकवायला वेगवेगळे मातीचे पुतळे, चिंध्यांनी तयार केलेले माणसांचे पुतळे अशा अनेक गोष्टी वापरायचे. इज इट नॉट अमेझिंग?
आयुर्वेदात अशा बऱ्याच अमेझिंग गोष्टी आहेत आणि त्या सगळ्यांशी शेअर करायला मला नक्कीच आवडेल. तर मग आज ह्याच नोट वर निरोप घेऊ या.