Thursday, November 4, 2010

अभ्यंगस्नान

ॐ 
०४-११-२०१०
 अभ्यंगस्नान

दिवाळीचा पहिला दिवस. पहाटे पहाटे उठायचं. सगळीकडून फ़टाक्यांचे आवाज यायचे. थंडीही चांगलीच असायची. दारासमोरचा कंदील, अंगणात काढलेली रांगोळी आणि  घरात सगळ्यांची अभ्यंगस्नानासाठी चाललेली लगबग. पाट, त्याभोवती रांगोळी, दुधात भिजवलेल्या उटण्याचा सुगंध. मग प्रत्येकाच्या आंघोळीच्या वेळी लावले जाणारे फ़टाके आणि नंतर नवे कपडे घालून देवाला नमस्कार करून, फ़राळाचा नैवेद्य देवाला अर्पण करून, घरातल्या वडीलधार्यांना नमस्कार करून मग  केला जाणारा फ़राळ. आमच्या लहानपणची दिवाळी अशीच काहीशी असायची.
नरकचतुर्दशी, दिवाळीचा पहिला दिवस. नरकासुराचा वध केला तो दिवस. पूर्वी पहाटे पहाटे रेडियोवर नरकासुराच्या वधाचं कीर्तन लागायचं आणि मंगलमय वातावरणात सुरू झालेली ही दिवाळी कधी तीन तर कधी चार दिवसांपर्यंत चालायची. 
दिवाळीची सुरुवात व्हायची ती अभ्यंगस्नानाने. अंगाला तेल लावलं जायचं आणि मग त्यावर दुधात भिजवलेलं उटणं संपूर्ण अंगाला लावलं जायचं. आयुर्वेदात खरं तर हे अभ्यंग रोजच्या रोज करावं असं सांगितलेलं आहे. आपण रोज संपूर्ण दिवसात काय काय करायला हवं म्हणजे आपलं आरोग्य टिकवण्यासाठी काय काय करायला हवं, हे सांगण्यासाठी आयुर्वेदाने  दिनचर्या म्हणजे संपूर्ण दिवसात काय करावं ते सांगितलेलं आहे. ह्या दिनचर्येची सुरुवातच उठण्यापासून होते. उठल्यानंतर दात कशाने घासावेत इथपासून सगळ्या गोष्टी सविस्तर आणि सकारण सांगितलेल्या आहेत. मजा माहितेय का, जेव्हा टूथब्रशचा शोधही लागला नव्हता तेव्हा बाभूळ, कडुनिंब, खैर, करंज ह्या वनस्पतींच्या ट्विग्ज दात घासण्यासाठी वापरल्या जायच्या आणि त्रिकटु म्हणजे सुंठ, मिरी व पिंपळी ह्यांच सारख्या प्रमाणात एकत्र चूर्ण थोड्याशा मधात मिक्स करून दात घासण्यासाठी वापरलं जायचं. काही वर्षापूर्वीपर्यंत बरेच लोक दात घासण्यासाठी बाभळीच्या ट्विग्ज वापरतही होते, पण आता त्या फ़ारशा कुठे दिसत नाहीत. ह्याचा मुख्य फ़ायदा म्हणजे ह्याने दात  आणि हिरड्या चांगल्या मजबूत व्हायच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे दात किडण्यापासूनही बचाव व्हायचा. कारण बाभूळ दात आणि हिरड्या दोन्हीला चांगला बळकट करणारा, कडुनिंब दाताला कीड लागण्यापासून रोखणारा, खैर आणि करंजही हेच काम करणारे.   
आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी जे अभ्यंगस्नान करतो, त्यातलं अभ्यंग आणि स्नान हे दोन्ही  ह्या दिनचर्येत सांगितलेले आहेत.
अभ्यंग म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावणे, थोडक्यात तेलाने मालीश करणे आणि त्यानंतर उदवर्तन म्हणजे उटणे लावणे. अर्थातच आधी अभ्यंग आणि मग उदवर्तन हाच क्रम. हे अभ्यंग का करायचं? ह्याचं कारणही आयुर्वेदाने खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. आपल्या शरीराच्या त्वचेत आपल्या नर्व्हज असतात आणि ह्याच नर्व्हजमार्फ़त ब्रेनपर्यंत सेन्सेशन पोचवले जाते. आयुर्वेदानुसार हे काम वायु म्हणजेच शरीरात राहणार्या वात ह्या दोषाचे आहे. मग हे काम नीट होण्यासाठी नर्व्हज आणि मुख्य म्हणजे शरीरातला वात दोष व्यवस्थित रहायला हवा. तो तसा राहण्यासाठी तेलाने केलेल्या अभ्यंगाची फ़ार मदत होते कारण तेल हे शरीरातल्या वातावर काम करणार अत्यंत गुणकारी औषध आहे. अभ्यंगानंतर उदवर्तन केलं जातं म्हणजेच उटणं लावलं जातं. ह्यामुळे स्किनवर जी पोअर्स असतात, ज्यातून आपला घाम बाहेर पडतो, ती पोअर्स क्लिन व्हायला मदत होते. कारण ही पोअर्स क्लिन झाल्यानेच शरीरातला स्वेट म्हणजे घाम योग्य प्रकारे बाहेर टाकला जातो. कारण घामावाटे शरीरातले अनेक अनावश्यक घटक बाहेर टाकले जात असतात. मात्र उटणं लावताना नेहमी एक गोष्ट लक्शात ठेवायला हवी की त्वचेवर नेहमी वरच्या दिशेने उटणं लावायला हवं म्हणजेचं त्वचेवरच्या केसांची जी डिरेक्शन आहे त्याच्या अपोझिट- अपवर्ड डिरेक्शनमध्ये उटणं लावायला हवं. 
आता ह्याचे फ़ायदे आपण वर बघितलेच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामुळे स्किनचं सौंदर्य वाढायला मदत होते. 
खरं तर असं अभ्यंग रोजच करायला हवं. पण आपण हल्ली निदान दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरी आठवणीने अभ्यंगस्नान करतो. 
आज आपल्याला मन, आत्मा सारख्या विषयांवर आयुर्वेदाचं मत बघायचं होतं. पण अभ्यंगाच्या विषयात तो मुद्दा मागेच राहिला. पण मनाचा आणि ह्या अभ्यंगाचंही परस्परांशी रिलेशन आहे आणि ते म्हणजे अभ्यंग आपल्या मनालाही प्रसन्न करतं. खरं तर मन ह्या विषयावर एवढं काही बोलण्यासारखं आहे की ते आपण सविस्तरच पाहू. मनाबद्दल अगदी सोप्या भाषेत, प्रत्येकाला कळेल अशा पद्धतीने बापूंनी ग्रंथराजाच्या प्रेमप्रवास खंडात सांगितलेलं आहे. खर सांगायच तर ज्यांना आयुर्वेद माहीत आहे किंवा जे आयुर्वेद शिकलेले आहेत त्यांच्यासाठी हा ग्रंथराज म्हणजे माहितीचा खजिना आहे. कारण आयुर्वेदातले अनेक कन्सेप्टस ह्यात बापूंनी अगदी प्रत्येकासाठी अतिशय सोपे करून सांगितलेले आहेत. हा माझा स्वत:चा अनुभव आहे.  
तर मन ह्या विषयावर आपण पुढल्या पोस्टमध्ये नक्की बोलू. 
आज दिवाळीच्या शुभेच्छा देऊन इथेच निरोप घेऊया.