Tuesday, December 7, 2010

मन

ॐ 
७-१२-२०१० 

मन
रविवारी घरात आवराआवरी करताना अचानकपणे जुने फ़ोटो सापडले. अगदी कॉलेजच्या काळापासूनचे. कॉलेजच्या आय.डी कार्डवर लावलेलेही, घरातल्या वेगवेगळ्या समारंभांचे. सॉलिड मजा वाटली ते फ़ोटो बघताना आणि त्यातल्या ब-याचश्या फ़ोटोतले प्रसंग, ती स्थळ, वेगवेगळी माणसं अगदी काल परवा पाहिल्यासारखी आठवली. खूपच गंमत वाटली आणि स्वत:च्या मेमरीची पण मजा वाटली. कधी कधी १०-१५मिनिटांपूर्वी घडलेली एखादी गोष्ट लक्षात राहत नाही आणि ते फ़ोटो बघितल्यानंतर त्यातली किती तरी ठिकाण अगदी कालच बघितली असावीत अशी स्पष्ट आठवली. मलाच माझी मोठी गंमत वाटली आणि परत एकदा मानवी मनाची ताकद प्रत्ययाला आली. आपण मागच्याच पोस्टमध्ये मनाबद्दल बोललो होतो. खरच माणसाचं मन कसं आहे हे आपल्याला कळायला खूप अवघड आहे. आपण आपल्या घरात बसून मनाने जगात कुठेही फ़िरून येऊ शकतो, आहे की नाही ग्रेट गोष्ट. जे कधी घडू शकणार नाही अशी कल्पनाचित्र पण आपलं मनच रंगवत असतं. मनाने एका क्षणात भूतकाळात जातो आणि तितक्याच सहजपणे आपलं मन आपल्याला भविष्याची स्वप्नही दाखवतं.
म्हटलं तर मनाची ताकद किती सॊलिड आहे नाही का? म्हणूनच ती आपल्याला योग्य दिशेने वापरता यायला हवी. कारण मन जेवढे चांगले विचार करतं तेवढेच वाईट विचारही करू शकतं आणि करतंही. म्हणूनच मराठीत म्हटल जातं की मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे आपलं स्वत:च मन जितक्या टोकाचा वाईट विचार स्वत:साठी करू शकतं तितका कदाचित आपला एखादा शत्रुही करणार नाही.
तर आज परत एकदा मनाचंच पुराण. आज मनाविषयी दुसरा महत्त्वाचा मुद्दा. शास्त्रात म्हटलं आहे की मन हे अन्नमय असतं. आपण मागेच म्हटलं की मन डोळ्यांनी दिसत नाही पण त्याचं काम तर दिसतं मग जसं शरीराचं पोषण होतं तर मग शरीरातल्या ह्या अवयवाचं पोषण होतं असणारचं. मनाचं पोषणही शरीराप्रमाणेच आपण जे काही खातो, त्यापासूनच होतं.  म्हणूनच मग सात्त्विक अन्न खा, असं आपल्याला सांगितलं जातं. आज काल नेमकं काय खायचं हा प्रश्न हा ब-याच जणांना पडलेला असतो. त्यातून मग वेगवेगळी पुस्तकं, इन्फ़र्मेशन देणारी मटेरियल्स वाचली जातात, जी आहाराशी संबंधित असतात.
ह्या संदर्भात एक गोष्ट आठवली. फ़ार पूर्वीच्या काळी एक मोठे अध्यात्मातले अधिकारी व्यक्ती होते. पूर्णपणे संन्यस्त जीवन जगणारे. कशाचाही मोह, राग, लोभ, खेद नसणारे. ते एका गावात एका घरी जेवायला गेले आणि जेवल्यानंतर त्यांच्या मनात चक्क चोरीचे विचार यायला लागले. अशक्यप्राय अशा ह्या घटनेचा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना असं कळलं की त्यांना जेवण घालणार्या व्यक्तीने त्याचा सगळा पैसा चोरीमारी करून मिळवला होता आणि आता त्यातून श्रीमंत होऊन तो दानधर्म करत होता. अर्थातच त्या संन्यस्त व्यक्तिमत्त्वाला ह्या अन्नातून जे काही दोष लागायचे ते लागलेचं कारण त्यांच मनच इतकं निर्मळ झालेलं होतं की अनुचित मार्गाने मिळवलेल्या पैशाने तयार केलं गेलेलं अन्न खाताच त्यांच्या मनावर परिणाम होऊन कधी मनाला शिवलेही नसतील असे चोरीचे विचार त्यांच्या मनात यायला लागले. तात्पर्य, माणूस जे काही खातो त्याचा त्याच्या मनावर परिणाम हा होतोच. म्हणूनच मग ज्या दिवशी बराच वेळ जप करायचा असतो अशा वेळी मन चंचल करणार्या कांदा, लसूण ह्यासारख्या गोष्टी खाऊ नयेत म्हणून सांगितल जातं. कांदा आणि लसूण दोन्ही गोष्टी मनाला  चंचल करतात त्यामुळे जपात मन स्थिर होऊ शकत नाही.
आता तरी परत प्रश्न राहिलाच की काय खायचं आणि काय खायचं नाही हा. हा प्रश्न श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराजाने अगदी सजपणे सोडवलेला आहे. सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी लिहिलेल्या ह्या ग्रंथात त्यांनी आहारातल्या कोणत्या अन्नपदार्थाचे काय गुण आहेत ते सांगितलेले आहेत आणि त्यावरून कोणीही सहजपणे काय खायचं आणि काय नाही ह्याचा निर्णय घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथराज तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, ह्याचा निर्णय कसा करायचा थोडक्यात स्वत:च व्यक्तिमत्व ओळखायला मदत करतो आणि आपलं व्यक्तिमत्व सगळ्यात बेस्ट व्हावं म्हणून आहार, विहार इ. त काय बदल करायचे ते सांगतो.
कारण जोपर्यंत आपल्या मनात बदल घडत नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही. कारण शास्त्रातचं सांगितलेलं आहे की मानवाच्या पुन्हा पुन्हा जन्म घेण्याला किंवा मुक्तीला मनच कारणीभूत असतं.