Monday, June 6, 2011

नवं कोरं

६जून२०११
 
नवं कोरं
जून महिन्याची सुरुवात. अगदी आजही जून उजाडला की शाळा कॉलेजच्या दिवसांची आठवण होते. तेव्हा जूनच्या पहिल्या आठवडयात शाळेची वह्या, पुस्तकं, कंपास, पेन, पेन्सिली असं सगळं काही खरेदी केलं जायचं. नव्या वह्यांना आणि नव्या पुस्तकांना एक मस्त वास यायचा. अजूनही जून उजाडला की तो वास आठवतो, पण आजकालच्या नव्या पुस्तकांना, नव्या वह्यांना असा वास येतो की नाही याची काही कल्पना नाही. आमच्या शाळेची सुरुवातच मुळी झाली, ती पाटी आणि पेन्सिलने. त्या पाटीवरच्या पेन्सिलला एक मस्त सुगंध यायचा. 
पाटी-पेन्सिल वापरणा-या अनेकांना कधी तरी ही पाटीवर लिहिण्याची पेन्सिल खाल्याचंही आठवत असेल. तर पाटी-पेन्सिल एक सॉलिड कॉम्बिनेशन होतं. पाटीवर लिहिलेलं नको असलं की पाण्याने नाहीतर ओल्या स्पंजने पुसायचं आणि मग थोडाच वेळ ती पाटी वाळवायची- अगदी काही सेकंदातच ती वाळायची आणि मग पुन्हा पुढे त्यावर लिहायला पाटी तयार. अगदी कोरी-जणू नवी असल्यासारखी. मी स्वत: अगदी आयुर्वेदाचा अभ्यास करताना पाटी आणि पेन्सिल वापरलेली होती. 
आता पाटी-पेन्सिलची प्रकर्षाने आठवण व्हायचं कारण म्हणजे श्रीवरदाचण्डिकाप्रसन्नोत्सव संपन्न झाल्यानंतरच्या गुरुवारी परमपूज्य बापूंनी ह्या उत्सवाचा त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला त्याचा काय फायदा झाला हे सांगताना पाटी-पेन्सिलचं अगदी सुंदर उदाहरण दिलं.
पाटीवर पेन्सिलने लिहिलं की ते खोडता येतं आणि काहीही खुणा (मार्क्स) न राहता परत पाटी कोरी होते आणि त्यावर हवं ते लिहिता येतं, वहीवर शिसपेन्सिलने लिहिलं की खोडायला इरेझर लागतो आणि त्यानंतर परत लिहिता येतं असलं तरी आधीचं इरेझरने खोडलेलं आहे हे कळतं आणि वहीवर पेनाने लिहिलं की बरेच वेळा खोडण्यासाठी काटच मारावी लागते. 
श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवाने नेमकं काय दिलं, तर त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाची पाटी कोरी करून दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन गोष्टी लिहायला प्रत्येक जण सज्ज. 
आता जाता जाता आयुर्वेदाविषयी थोडसं. जूनचा महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना. आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं तर वर्षा रुतु. ह्या सीझनमध्ये नेमकं काय करायला हवं. कारण ह्यात आजारी पडण्याची शक्यता जास्त. पावसामुळे आणि पावसाळी हवेमुळे आजारी पडण्याचे चान्सेस जास्त. म्हणून पहिलं लक्ष पिण्याच्या पाण्याकडे. ह्या सीझनमध्ये निर्जंतुक पाणीच प्यायला हवं. आयुर्वेदाच्या मते ह्या सीझनमध्ये आपली पचनशक्ती थोडी कमी होते, त्यामुळे ह्या सीझनमध्ये खाण्यावरही लक्ष द्यायला हवं. जास्त स्पायसी, तेलकट गोष्टी खाण्यावर कंट्रोल ठेवायला हवा नाहीतर त्याच पुढे जाऊन त्रासदायक होतात. पण पावसाळा म्हटला की प्रत्येकाला हटकून आठवण होते ती आल्याचा चहा आणि गरमागरम भजी विशेषत: कांद्याची, खरं की नाही?