Monday, June 6, 2011

नवं कोरं

६जून२०११
 
ॐ
नवं कोरं
जून महिन्याची सुरुवात. अगदी आजही जून उजाडला की शाळा कॉलेजच्या दिवसांची आठवण होते. तेव्हा जूनच्या पहिल्या आठवडयात शाळेची वह्या, पुस्तकं, कंपास, पेन, पेन्सिली असं सगळं काही खरेदी केलं जायचं. नव्या वह्यांना आणि नव्या पुस्तकांना एक मस्त वास यायचा. अजूनही जून उजाडला की तो वास आठवतो, पण आजकालच्या नव्या पुस्तकांना, नव्या वह्यांना असा वास येतो की नाही याची काही कल्पना नाही. आमच्या शाळेची सुरुवातच मुळी झाली, ती पाटी आणि पेन्सिलने. त्या पाटीवरच्या पेन्सिलला एक मस्त सुगंध यायचा. 
पाटी-पेन्सिल वापरणा-या अनेकांना कधी तरी ही पाटीवर लिहिण्याची पेन्सिल खाल्याचंही आठवत असेल. तर पाटी-पेन्सिल एक सॉलिड कॉम्बिनेशन होतं. पाटीवर लिहिलेलं नको असलं की पाण्याने नाहीतर ओल्या स्पंजने पुसायचं आणि मग थोडाच वेळ ती पाटी वाळवायची- अगदी काही सेकंदातच ती वाळायची आणि मग पुन्हा पुढे त्यावर लिहायला पाटी तयार. अगदी कोरी-जणू नवी असल्यासारखी. मी स्वत: अगदी आयुर्वेदाचा अभ्यास करताना पाटी आणि पेन्सिल वापरलेली होती. 
आता पाटी-पेन्सिलची प्रकर्षाने आठवण व्हायचं कारण म्हणजे श्रीवरदाचण्डिकाप्रसन्नोत्सव संपन्न झाल्यानंतरच्या गुरुवारी परमपूज्य बापूंनी ह्या उत्सवाचा त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला त्याचा काय फायदा झाला हे सांगताना पाटी-पेन्सिलचं अगदी सुंदर उदाहरण दिलं.
पाटीवर पेन्सिलने लिहिलं की ते खोडता येतं आणि काहीही खुणा (मार्क्स) न राहता परत पाटी कोरी होते आणि त्यावर हवं ते लिहिता येतं, वहीवर शिसपेन्सिलने लिहिलं की खोडायला इरेझर लागतो आणि त्यानंतर परत लिहिता येतं असलं तरी आधीचं इरेझरने खोडलेलं आहे हे कळतं आणि वहीवर पेनाने लिहिलं की बरेच वेळा खोडण्यासाठी काटच मारावी लागते. 
श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवाने नेमकं काय दिलं, तर त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाची पाटी कोरी करून दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन गोष्टी लिहायला प्रत्येक जण सज्ज. 
आता जाता जाता आयुर्वेदाविषयी थोडसं. जूनचा महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना. आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं तर वर्षा रुतु. ह्या सीझनमध्ये नेमकं काय करायला हवं. कारण ह्यात आजारी पडण्याची शक्यता जास्त. पावसामुळे आणि पावसाळी हवेमुळे आजारी पडण्याचे चान्सेस जास्त. म्हणून पहिलं लक्ष पिण्याच्या पाण्याकडे. ह्या सीझनमध्ये निर्जंतुक पाणीच प्यायला हवं. आयुर्वेदाच्या मते ह्या सीझनमध्ये आपली पचनशक्ती थोडी कमी होते, त्यामुळे ह्या सीझनमध्ये खाण्यावरही लक्ष द्यायला हवं. जास्त स्पायसी, तेलकट गोष्टी खाण्यावर कंट्रोल ठेवायला हवा नाहीतर त्याच पुढे जाऊन त्रासदायक होतात. पण पावसाळा म्हटला की प्रत्येकाला हटकून आठवण होते ती आल्याचा चहा आणि गरमागरम भजी विशेषत: कांद्याची, खरं की नाही?

Wednesday, April 27, 2011

अनादि अनन्त आयुर्वेद

२७-०४-२०११


ॐ

अनादि अनन्त आयुर्वेद

आयुर्वेद आपल्या भारतातलं सगळ्यात प्राचीन वैद्यकशास्त्र. खरं तरं आयुर्वेद हा कुणी लिहिलेला नाही. तो कसा अस्तित्वात आला, त्याविषयी आयुर्वेदात अगदी सुरुवातीलाच सांगितलं जातं. आयुर्वेद शिकणा-या स्टुडन्टसना अगदी सुरुवातीलाच ह्याची माहिती करून दिली जाते.
आयुर्वेद कुणाही मनुष्याने लिहिलेला नाही. तो जेव्हा मानवी जीवन अस्तित्वात आले, त्याच्या आधीपासूनच अस्तित्वात होता. म्हणून आयुर्वेदाला अनादि, अनंत असं म्हटलं जातं. अनादि-म्हणजे जो कधी लिहिला गेला किंवा कधी निर्माण झाला हे कोणीही सांगू शकत नाही, अनंत-म्हणजे कुठल्या एका पॉईंटला आता आयुर्वेदाचे नॉलेज संपलं असं होतच नाही. खरं तर प्रत्येक माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. कारण ह्या जगात आपल्याला शिकण्यासाठी प्रत्येक क्षणाला काही ना काही तरी असतंच. आयुर्वेद हा ब्रह्मा, प्रजापति, अश्विनीकुमार आणि इंद्र ह्यांच्याकडून आयुर्वेदाच्या आचार्यांकडे आला आणि त्यांच्याकडून मग गुरु-शिष्य परंपरेने आयुर्वेदाचं नॉलेज इतरांपर्यंत पोहोचलं.
पूर्वी जेव्हा लेखनकला म्हणजे कागद, शाई, प्रिंटींग ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या, तेव्हा मौखिक परंपरेने आयुर्वेद एका पिढीकडून पुढल्या पिढीकडे पोचला. म्हणजे गुरु शिष्यांना जे काही शिकवीत, ती प्रत्येक गोष्ट शिष्य अक्षरश: तोंडपाठ करायचे आणि मग ते इतरांना शिकवायचे. नंतर जेव्हा लेखनकलेचा शोध लागला, तेव्हा वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांवर, झाडाच्या खोडांच्या सालीवर (बार्क) ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या जाऊ लागल्या. ह्यातूनच आयुर्वेदाचे अनेक ग्रंथ निर्माण झाले, जे आजही प्रमाण मानले जातात. आजही आपल्याला काही म्युझियम्समध्ये पूर्वीचे काही वेगवेगळ्या विषयावरचे हस्तलिखित ग्रंथ पहायला मिळतात. आज कॉम्प्युटरचं एक बटन क्लिक केल्यावर आपल्याला हवी ती माहिती मिळते, तेव्हा नुसता विचार करून बघा की तेव्हा अशा प्रकारे हस्तलिखित निर्माण करायला, किती वेळ लागत असेल आणि किती श्रम घ्यावे लागत असतील.
वैद्यकशास्त्र शिकणा-यांना गुरुचे महत्त्व काय आणि किती असते, हे वेगळं सांगायची गरजच नाही आणि वैद्यकशास्त्र शिकणारे जेव्हा प्रॅक्टीस करायला लागतात, तेव्हा त्यांना परमात्म्याचं-सद्‍गुरुंचं महत्त्व अगदी प्रत्येक क्षणाला अनुभवाला येतं. "आय ट्रीट ही क्युअर्स’ ही गोष्ट वैद्यकशास्त्रात प्रसिद्धच आहे. मी स्वत:च्या प्रॅक्टीसमध्ये अनेक वेळा ह्याचा अनुभव घेतलेला आहे. श्रद्धावान ह्याला त्याच्या सद्‍गुरुंचा त्याला आलेला अनुभव म्हणतो. ह्या अनुभवामागे त्याचा त्याच्या सद्‍गुरुंवर असणारा विश्वास, श्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी असतातच.
अध्यात्मामध्ये अनेक वेळा कर्म-कर्मफ़ळ हा शब्द ऐकण्यात येतो. आयुर्वेदही कर्माचा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो की मनुष्याने केलेलं कुठलंही लहानात लहान कर्म का असेना, प्रत्येकाला त्याचं फ़ळ भोगावंच लागतं. झोपणं, बोलणं, खाणं, येणं, जाणं, बसणं अगदी विचार करणं हेदेखील कर्मामध्येच अंतर्भूत होतं आणि काहीही न करणं हेदेखील एक कर्मच आहे. कर्माविषयी सर्वांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत बापूंनी म्हणजेच सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराजात अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे.
म्हणजे आपली कुठलीही क्रिया ही कर्माच्या अंतर्गत जर येते तर आपल्या आजारी पडण्याचाही कर्माच्याशी काही तरी संबंध असलाच पाहिजे. नाही का?

Monday, February 28, 2011

अनिरुध्दाज्‌ इंस्टिट्यूट ऑफ ग्रामीण विकास





ग्रामीण विकास योजनेतील वनराई बंधार्‍याबाबत स्वप्निलसिंह यांना मार्गदर्शन करताना परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुध्द बापू


पशूपालना विषयी स्वप्निलसिंह यांना मार्गदर्शन करताना परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुध्द बापू
सेंद्रीय शेती सुपीक माती ! पर्यावरण-र्‍हासाची नाही भीती !!
थेंबे थेंबे तळे साचे, स्वप्न होई पूर्ण ग्रामीण विकासाचे
फळबाग योजनाविषयक चर्चा करताना परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुध्द बापू व परमपूज्य सुचितदादा
"वात्सल्याची शुध्द मूर्ती, नंदाई काळजी वाही"

परसबाग फुलवूया, ग्राम-विकास घडवूया !


परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या मार्गदर्शनानुसार श्री. स्वप्निलसिंह यांनी ग्रामीण विकास योजनेच्या कार्याची सुरुवात गोविद्यापीठम येथे केली आहे. त्याची ही एक झलक.


























Friday, January 28, 2011

ऋतुचर्या

ॐ
 २८-०१-२०११

ऋतुचर्या


खूप थंडी पडलेली असताना लिहिलेल्या पोस्टनंतर खूपच दिवसांनी ही पुढली पोस्ट. आता ब-याच ठिकाणी ब-यापैकी उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. 
क्लायमेट चेंज झाल्यानंतर घडणारी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारांची सुरुवात. आता थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्यावर सर्दी, खोकला यासारखे आजार डोक वर काढायला लागतात आणि ह्या रोगांच कारण आपल्याला माहीत असतंच, क्लायमेटमध्ये झालेला बदल आणि प्रत्येक वेळी असे क्लायमेटमध्ये बदल झाले की असे छॊटे मोठे आजार डोक वर काढतातच.
मग आज ह्याविषयीच थोड काही, अर्थातच आयुर्वेदाचा व्ह्यू. आपण संपूर्ण वर्षात तीन प्रकारच्या क्लायमेटचा अनुभव घेतो, उन्हाळा,पावसाळा आणि थंडी. अर्थात संपूर्ण जगात प्रत्येक ठिकाणी ह्याचं प्रमाण डिफ़र होतं. आयुर्वेद ह्यातीन प्रकारच्या क्लायमेटला सहा ऋतुंमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. हे सहा ऋतु- शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत.  हेमंत ऋतुत थंडीची सुरुवात होते आणि शिशिरात चांगलीच थंडी असते, वसंतात उन्हाळ्याची सुरुवात होते आणि ग्रीष्मात हा उन्हाळा खूप कडक होतो, वर्षा म्हणजे पावसाळा, शरदात पाऊस संपून पुन्हा एकदा उष्णता जाणवायला लागते म्हणजे ऑक्टोबर हिट. 
भारतीय कालगणनेनुसार सपूर्ण वर्षात १२ महिने असतात. जसे सध्या आपण जानेवारी ते डिसेंबर हे बारा महिने मानतो. ह्या १२ महिन्यातल्या प्रत्येक दोन महिन्यात मिळून एक ऋतु असं गणित असतं. म्हणजे आयुर्वेद काळात अशी कालगणना असायची. आता सगळ्या जगातच जानेवारी ते डिसेंबर असे बारा महिने असल्यामुळे आज काल ऋतु त्यानुसार डिव्हाइड केले जातात. 
प्रत्येक ऋतु मध्ये विशिष्ट क्लायमेट असतं आणि त्यानुसार मग आपल्याला आपलं बिहेवियर ठेवायला लागतं म्हणजे ज्या ऋतुत जसं क्लायमेट तसं आपलं जेवण इ. आयुर्वेदाने कोणत्या ऋतुत काय खायचं काय खायचं नाही, काय करायचं काय करायचं नाही ह्याचा पूर्ण विचार केलेला आहे आणि त्याला ऋतुचर्या असं नाव दिलेलं आहे. एकूण सहा ऋतुंच्या सहा ऋतुचर्या. मग ह्यामध्ये काय खायचं काय नाही इथपासून ते कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे हे सगळं सांगितलेलं आहे. फ़ॉर एक्झाम्पल शिशिर ऋतुमध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं मग अशावेळी लोकरीचे जाड कपडे घालणं आवश्यक आहे. तर उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायचे. ऋतुचर्येतला महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या ऋतुत कोणत्या दोषाचा प्रकोप होतो आणि का होतो, हे सविस्तर सांगितलेलं आहे आणि मग त्यावर काय उपाय करायचे ते देखील सांगितलेलं आहे. जसं आता थंडी संपून उन्हाळा सुरू झाला की सर्दी , खोकला होतो कारण जसा उष्णतेने बर्फ़ वितळतो तसाच बाहेरच्या उष्णतेमुळे थंडीत शरीरात अ‍ॅक्युम्युलेट झालेला कफ़ पातळ होतो आणि सर्दी, खोकला ह्यांची सुरुवात होते, तसचं पावसाळ्यात शरीरात पित्त अ‍ॅक्युम्युलेट होतं आणि ते शरद ऋतुतल्या उष्णतेने शरीरात वेगवेगळे रोग उत्पन्न करू शकतं त्याचप्रमाणे उन्हाळ्यात शरीरात वात अ‍ॅक्युम्युलेट होतो आनि तो त्यानंतर येणा-या पावसाळ्यात वाताचे वेगवेगळे डिसीजेस उत्पन्न करू शकतो. 
अर्थात ह्या क्रिया जरी नॅचरल असल्या तरी त्यावरचा उपायही आयुर्वेदा सांगतो कारण शेवटी आयुर्वेदाला माणसाची हेल्थ चांगली ठेवायची आहे. म्हणूनच ह्यावरचा पहिला उपाय आयुर्वेदाने सांगितला आहे,तो म्हणजे एक ऋतु बदलून जेव्हा दुसरा सुरू होणार असतो तेव्हा जाणा-या ऋतुचा शेवटचा आठवडा आणि येणा-या ऋतुचा पहिला आठवडा, ज्याला ऋतुसंधि म्हटलं जातं, त्यात आधी आपण जे सगळे जेवणाचे, वागण्याचे रुल्स फ़ॉलो करतो ते हळूहळू सोडून द्यायचे आणि हळूहळू नव्या येणा-या ऋतुच्या जेवण्या-वागण्यासंबंधीच्या रुल्सना फ़ॉलो करायचं. ह्यामुळे जरी शरीरात वर सांगितल्याप्रमाणे नॅचरल चेंजेस घडले म्हणजे शरीरातले दोष विशिएट झाले तरी ते कंटोलमध्ये राहतील आणि डिसीज उत्पन्न करू शकणार नाहीत. दुसरा आयुर्वेदाचा उपाय म्हणजे विशिष्ट ऋतुत विशिष्ट पंचकर्म करणं. आजकाल पंचकर्म हा शब्द ब-याच जणांना ऐकून माहीत आहे. ह्या पंचकर्माविषयी पुढे कधीतरी सविस्तर बोलूया.       
ह्यात आणखी एक महत्त्वाची इन्फ़र्मेशन द्यायची म्हणजे कुठल्या ऋतुत कुठलं पाणी प्यायचं, तेही ऋतुचर्येत सांगितलेलं आहे. शरद ऋतुत अगस्ती नावाच्या ता-याचा उदय होतो आणि त्यावेळी सगळ्या पॉन्डस, लेक्स मधल पाणी निर्विष होतं असं आयुर्वेदात वर्णन येतं, त्याला त्यांनी हंसोदक असं नाव दिलेलं आहे. कारण हंस नेहमी फ़क्त शुद्ध पाणीच पितो, असं सांगितलं जातं आणि म्हणूनच शुद्ध पाण्याला त्याकाळी हंसोदक ही उपमा दिली जात असावी. आज काल आपल्याला प्युरिफ़ाइड पाणी सहज मिळतं त्यामुळे आपल्याला त्या काळातल हे पाण्याविषयीचं वर्णन वाचून आश्चर्य वाटेल.  
आता सध्या काही दिवसांपूर्वीच संक्रांत होऊन गेली. खर तर संक्रांत म्हणजे संक्रमण. ह्या वेळी सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. त्यामुळे आता भारतात दिवस हळूहळू मोठा व्हायला सुरुवात होते. ह्या वेळी संक्रांतीच्या वेळी असंख्य स्त्रियांनी बापूंनी रामराज्याच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे "श्रीमंगलचण्डिकानैमित्तिकप्रपत्ती’’ केली. ह्याचा मुख्य उद्देश्य बापूंनी सांगितला होता की "ही प्रपत्ती करणारी स्त्री तिच्या कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते”. ह्याविषयी बापूंनी आणखी जे काही सांगितलेलं आहे, ते मूळातून वाचण्यासारखं आहे. पण ह्यावरून आपल्या मुख्य ही गोष्ट लक्षात येईल की ही प्रपत्ती करणारी स्त्री स्वत:तर सबल बनतेच आणि इतकी सबल बनते की तिच्यामध्ये तिच्या पूर्ण कुटुंबाचं रक्षण करण्याची कपॅसिटी येते. रियली अमेझिंग. कारण रक्षण करायला फ़िजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारची स्ट्रेंथ लागते आणि ही प्रपत्ती केल्याने अर्थातच ती मिळते. रामराज्याच्या प्रवचनात बापूंनी पुरुषांसाठी श्रावणातल्या सोमवारी "श्रीरणचण्डिकानैमित्तिकप्रपत्ती” सांगितली होती, जी अर्थातच मागच्या वर्षी श्रावण महिन्यात पुरुषांनी केलीही. 
सध्याचा काळ बघितला तर रोजच्या लाइफ़मध्येच आपण एवढ्या स्ट्रेस आणि स्ट्रेन्सना सामोरे जात असतो की अशा वेळी आपल्याला फ़िजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारच्या स्ट्रेन्थच महत्त्व आणि गरज लक्षात येते आणि माणसाने कितीही एफ़र्टस केले तरी ह्या दोन्ही स्ट्रेन्थ एकाच वेळी आणि प्रत्येकासाठी उचित तेवढ्या प्रमाणात केवळ सद्‍गुरुच देऊ शकतात.

Friday, December 24, 2010

आहार

ॐ                   आहार                                           २४-१२-२०१०
सगळीकडेच खूप मस्त थंडी पडलीय़ॆ. अशा थंडीत साहजिकपणेच काही तरी स्पाईसी खावंसं वाटतं, नाही का? स्पाईसी खायचं म्हणजे त्यात स्पाईसेस असणारचं आणि स्पाईसेस म्हणजे आपले मसाल्याचे पदार्थ जे भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग असतात. अगदी भाजीच्या फ़ोडणीपासून ह्या मसाल्यांच्या वापराची सुरुवात होते. साधी आपली मोहरी, हळद आणि हिंग हे फ़ोडणीचे तीन बेसिक घटक मसाल्याच्याच पदार्थातले आहेत आणि मसाले म्हणजे तिखट, चटपटीत, जेवणाला चव देणारे अशी आपल्याला त्यांची साधारण ओळख असते पण आयुर्वेद ह्या पदार्थांचे औषधी गुणधर्म सांगतो. वास्तविक त्यांचा रोजच्या जेवणात वापर करण्यामागे महत्त्वाची संकल्पना अशी असावी की रोजच्या रोज थोड्याशा प्रमाणात त्यांचे गुण जेवणातून पोटात जावेत. सगळ्याच मसाल्याच्या पदार्थांचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते ज्या पदार्थात घातले जातात त्याची चव वाढवतात. मसाल्याच्या पदार्थांचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे ते काही प्रमाणात अन्नपचनालाही मदत करतात. पण जवळ जवळ सगळेच मसाल्याचे पदार्थ हे गरम-ऊष्ण, तिखट असतात, त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास असतो किंवा इतरांनीही ते जपूनच वापरले पाहिजेत आणि खरं सांगायचं तर कुठल्याही पदार्थात प्रमाणापेक्शा जास्त मसाले पडले तर त्याची चवच बिघडते. आता स्पाईसेस यादीतल्या नेहमीची मंडळींची ही थोडी ओळख- मोहरी-सरसों(मस्टर्ड), हळद(टर्मरिक), हिंग(असॆफ़ोटीडा) हे प्रत्येक फ़ोडणीचा बेस ह्याशिवाय तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, जावित्री, आलं,लसूण,ओवा,वेलची-छोटी आणि मोठी, जावित्री, जायफ़ळ, मिरची इ.
हे सगळे जरी मसाल्याचे पदार्थ ह्या कॅटेगरीत मोडणारे असले तरी प्रत्येकाची स्वत:ची वेगळी प्रॉपर्टी आहे.
हळद, सगळ्यात बेस्ट ब्लड प्युरीफ़ायर. भारतात लग्नाच्या आदल्या दिवशी वधू-वरांना हळद लावण्याची प्रथा आहे.  हळद जशी इंटर्नली घेता येते तशी ती एक्सर्टनली सुद्धा वापरता येते. ब्लड प्युरिफ़ायर असल्यामुळे ती त्वचेचा रंग उजळण्याचं काम करते. हळदीची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अ‍ॅटीसेप्टीकचं कामही खूप मस्त करते आणि जखमेतलं रक्त थांबविण्याचं कामही करते. त्यामुळे कुठेही खरचटलं किंवा छोटीशी जखम झाली आणि रक्त यायला लागलं की पहिली हळद त्यावर लावली जायची. त्यामुळे रक्त थांबायचं, जखम भरायची आणि कुठलंही इन्फ़ेक्शन देखील होत नसे. हिंग हा गॅसेस वर सगळ्यात चांगला समजला जातो. पूर्वी लहान मुलांना गॅस होऊन पोट जर फ़ुगलं तर पाण्यात हिंग मिक्स करून तो पोटावर लावला जायचा. अगदी मोठ्या माणसांनाही गॅसेस झाले तर ते जेवणाच्या शेवटी ताकाबरोबर हिंग घ्यायचे. गॅसेसमुळे होणार्या पोटदुखीवर ओवा सगळ्यात बेस्ट औषध. हे सगळे मसाल्याचे पदार्थ म्हणजे हळद, मोहरी इ. ड्राय़ वापरले जातात. पण आलं(जिंजर), लसूण(गार्लिक) ह्यासारखे पदार्थ वेट-ओले-फ़्रेश वापरले जातात. हळद कधी कधी ओलीही वापरली जाते पण त्याचं लोणचं इ. करून. आलं हे पचन-डायजेशन अतिशय चांगलं करणार आहे आणि हेच आलं सुकवून त्याच्यापासून जी सुंठ बनवली जाते ती तर अनेक रोगांवर रामबाण इलाज. म्हणजे जर आलं मिळाल नाही तरी सुंठीचा पर्याय कधीही मिळू शकणारा. 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मसाल्याच्या पदार्थांची झाड असतात. ह्यातलं आलं, हळद आणि लसूण हे पदार्थ जमिनीखाली मिळतात. थंडीच्या दिवसात लसूण तिच्या पानांसकट मिळते, पातीच्या कांद्यासारखी. काळीमिरी वेलावर लागते. तमालपत्र म्हणजे एका विशिष्ट झाडाची पानं-लिव्हज, दालचिनी म्हणजे त्याच झाडाची साल-बार्क.वेलची अगदी छोट्याशा झाडावर लागते. जायफ़ळ मोठ्या झाडाला लागतं आणि  जायफ़ळावर जी साल असते तिला जावित्री म्हणतात, तर लवंग म्हणजे  झाडाची कळी-बड, हिंग म्हणजे  झाडाच्या स्टेममधून बाहेर पडणारा एक प्रकारचा गोंद-रेझीन. मोहरीची झाडंही छॊटी असतात. सरसों नावाचा मोहरीसारखाच पदार्थ असतो आणि ह्या सरसोंच्या पानांची भाजी केली जाते त्याला  सरसों का साग म्हणतात. 
आता शेवटी थोडं महत्त्वाचं. ह्या थंडीच्या सीझनमध्ये वातावरणात खूप ड्रायनेस असतो त्यामुळे ह्या काळात शरीरातला ड्रायनेस वाढविणारे पदार्थ खाऊ नयेत. आहारातली कडधान्य शरीरात ड्रायनेस वाढवतात, म्हणून त्यांचा वापर टाळावा. "श्रीवर्धमान व्रताधिराज”च्या नऊ अंगांपैकी एक अंग आहारासंबंधी आहे आणि त्यात आहाराबद्दल विशेषरूपाने सांगण्यात आलेलं आहे. ह्या सीझनमध्ये तिळाचं तेल सगळ्यात बेस्ट- खाण्यासाठी आणि शरीरावर लावण्यासाठीही. आज आपण अनेक प्रकारची तेल वापरतो पण आयुर्वेदात वर्णन येतं की जे तिळापासून काढलं जातं त्यालाचं "तेल’’-ऑईल म्हणतात. तिळाच तेल सगळ्या प्रकारच्या तेलांमध्ये स्निग्ध आहे. थंडीतल्या ड्रायनेसवर सगळ्यात चांगला उपाय. "श्रीवर्धमान व्रताधिराज”चं एक अंग तिळाच्या तेलाच्या वापराविषयी आहे. अर्थात उपासना हे ह्या व्रताचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळे "श्रीवर्धमान व्रताधिराज” म्हणजे माणसांच्या मेंटल आणि फ़िजिकल दोन्ही प्रकारच्या हेल्थची सर्वोत्तम काळजी घेणारं. 
सो, आजसाठी एवढंच. आता बहुतेक आपली भेट न्यू इयरमध्येच. सो, हॅपी न्यू इयर टू ऑल इन अ‍ॅडवान्स.

Tuesday, December 7, 2010

मन

ॐ 
७-१२-२०१० 

मन
रविवारी घरात आवराआवरी करताना अचानकपणे जुने फ़ोटो सापडले. अगदी कॉलेजच्या काळापासूनचे. कॉलेजच्या आय.डी कार्डवर लावलेलेही, घरातल्या वेगवेगळ्या समारंभांचे. सॉलिड मजा वाटली ते फ़ोटो बघताना आणि त्यातल्या ब-याचश्या फ़ोटोतले प्रसंग, ती स्थळ, वेगवेगळी माणसं अगदी काल परवा पाहिल्यासारखी आठवली. खूपच गंमत वाटली आणि स्वत:च्या मेमरीची पण मजा वाटली. कधी कधी १०-१५मिनिटांपूर्वी घडलेली एखादी गोष्ट लक्षात राहत नाही आणि ते फ़ोटो बघितल्यानंतर त्यातली किती तरी ठिकाण अगदी कालच बघितली असावीत अशी स्पष्ट आठवली. मलाच माझी मोठी गंमत वाटली आणि परत एकदा मानवी मनाची ताकद प्रत्ययाला आली. आपण मागच्याच पोस्टमध्ये मनाबद्दल बोललो होतो. खरच माणसाचं मन कसं आहे हे आपल्याला कळायला खूप अवघड आहे. आपण आपल्या घरात बसून मनाने जगात कुठेही फ़िरून येऊ शकतो, आहे की नाही ग्रेट गोष्ट. जे कधी घडू शकणार नाही अशी कल्पनाचित्र पण आपलं मनच रंगवत असतं. मनाने एका क्षणात भूतकाळात जातो आणि तितक्याच सहजपणे आपलं मन आपल्याला भविष्याची स्वप्नही दाखवतं.
म्हटलं तर मनाची ताकद किती सॊलिड आहे नाही का? म्हणूनच ती आपल्याला योग्य दिशेने वापरता यायला हवी. कारण मन जेवढे चांगले विचार करतं तेवढेच वाईट विचारही करू शकतं आणि करतंही. म्हणूनच मराठीत म्हटल जातं की मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे आपलं स्वत:च मन जितक्या टोकाचा वाईट विचार स्वत:साठी करू शकतं तितका कदाचित आपला एखादा शत्रुही करणार नाही.
तर आज परत एकदा मनाचंच पुराण. आज मनाविषयी दुसरा महत्त्वाचा मुद्दा. शास्त्रात म्हटलं आहे की मन हे अन्नमय असतं. आपण मागेच म्हटलं की मन डोळ्यांनी दिसत नाही पण त्याचं काम तर दिसतं मग जसं शरीराचं पोषण होतं तर मग शरीरातल्या ह्या अवयवाचं पोषण होतं असणारचं. मनाचं पोषणही शरीराप्रमाणेच आपण जे काही खातो, त्यापासूनच होतं.  म्हणूनच मग सात्त्विक अन्न खा, असं आपल्याला सांगितलं जातं. आज काल नेमकं काय खायचं हा प्रश्न हा ब-याच जणांना पडलेला असतो. त्यातून मग वेगवेगळी पुस्तकं, इन्फ़र्मेशन देणारी मटेरियल्स वाचली जातात, जी आहाराशी संबंधित असतात.
ह्या संदर्भात एक गोष्ट आठवली. फ़ार पूर्वीच्या काळी एक मोठे अध्यात्मातले अधिकारी व्यक्ती होते. पूर्णपणे संन्यस्त जीवन जगणारे. कशाचाही मोह, राग, लोभ, खेद नसणारे. ते एका गावात एका घरी जेवायला गेले आणि जेवल्यानंतर त्यांच्या मनात चक्क चोरीचे विचार यायला लागले. अशक्यप्राय अशा ह्या घटनेचा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना असं कळलं की त्यांना जेवण घालणार्या व्यक्तीने त्याचा सगळा पैसा चोरीमारी करून मिळवला होता आणि आता त्यातून श्रीमंत होऊन तो दानधर्म करत होता. अर्थातच त्या संन्यस्त व्यक्तिमत्त्वाला ह्या अन्नातून जे काही दोष लागायचे ते लागलेचं कारण त्यांच मनच इतकं निर्मळ झालेलं होतं की अनुचित मार्गाने मिळवलेल्या पैशाने तयार केलं गेलेलं अन्न खाताच त्यांच्या मनावर परिणाम होऊन कधी मनाला शिवलेही नसतील असे चोरीचे विचार त्यांच्या मनात यायला लागले. तात्पर्य, माणूस जे काही खातो त्याचा त्याच्या मनावर परिणाम हा होतोच. म्हणूनच मग ज्या दिवशी बराच वेळ जप करायचा असतो अशा वेळी मन चंचल करणार्या कांदा, लसूण ह्यासारख्या गोष्टी खाऊ नयेत म्हणून सांगितल जातं. कांदा आणि लसूण दोन्ही गोष्टी मनाला  चंचल करतात त्यामुळे जपात मन स्थिर होऊ शकत नाही.
आता तरी परत प्रश्न राहिलाच की काय खायचं आणि काय खायचं नाही हा. हा प्रश्न श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराजाने अगदी सजपणे सोडवलेला आहे. सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी लिहिलेल्या ह्या ग्रंथात त्यांनी आहारातल्या कोणत्या अन्नपदार्थाचे काय गुण आहेत ते सांगितलेले आहेत आणि त्यावरून कोणीही सहजपणे काय खायचं आणि काय नाही ह्याचा निर्णय घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथराज तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, ह्याचा निर्णय कसा करायचा थोडक्यात स्वत:च व्यक्तिमत्व ओळखायला मदत करतो आणि आपलं व्यक्तिमत्व सगळ्यात बेस्ट व्हावं म्हणून आहार, विहार इ. त काय बदल करायचे ते सांगतो.
कारण जोपर्यंत आपल्या मनात बदल घडत नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही. कारण शास्त्रातचं सांगितलेलं आहे की मानवाच्या पुन्हा पुन्हा जन्म घेण्याला किंवा मुक्तीला मनच कारणीभूत असतं.

Saturday, November 20, 2010

मन:सामर्थ्यदाता

ॐ
२०-११-२०१०
मन:सामर्थ्यदाता

खूप दिवसांनंतर परत एक नवीन पोस्ट. आजची ही पोस्ट मन:सामर्थ्यदाता सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या चरणी समर्पित. उद्या त्रिपुरारि पौर्णिमा बापूंचा जन्मदिवस.
आज आपण मागे बोलायच्या राहिलेल्या विषयावर बोलूया. मन. प्रत्येक माणसाला एक मन असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्या मनावर आजपर्यंत सगळीकडे एवढं लिहिलं गेलयं की मन हा अभ्यासाचा आणि ट्रीटमेंटचा विषय आहे, हे मला देखील आयुर्वेद शिकायला लागेपर्यंत माहीत नव्हतं. आयुर्वेद शिकताना आम्हाला फ़र्स्ट इयरला एक सब्जेक्ट असायचा. त्या सब्जेक्टचं नाव, पदार्थविज्ञान. सुरुवातीला तो विषय खूप कठीण आणि बोअर वाटायचा, पण कळायला लागल्यावर तो इंटरेस्टींग वाटायला लागला. ह्यात मन, मनाची डेफ़िनेशन, त्याचं काम कस चालतं ह्या सगळ्याचं वर्णन होतं. 
आपलं मन हे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही करतो ते करायला मदत करतं. म्हणजे कसं तर आपण जेवतो, बोलतो, खातो, हसतो, वाचतो ह्या सगळ्याच्या सगळ्या क्रियांसाठी मनाचा प्रेझेंस आवश्यक असतो. तसचं आपल्याला जे काही नॉलेज होतं त्यासाठी मनच त्या त्या अवयवाशी संयुक्त व्हावं लागतं.
कोणताही माणूस असो प्रत्येकाच्या शरीरात फ़क्त एकच मन असतं आणि ते अणू म्हणजे अ‍ॅटम एवढं असतं. पण हे मन शरीरात काम कसं करतं हे माहीत करून घेण्यासारखं आहे. 
समजा आपण एखादं वेळी टि.व्ही. बघत असतानाच पेपर वाचतो त्याचवेळी कोणाशी तरी बोलतोही आणि खातो सुद्धा. सांगायचा मुद्दा की आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करतो आणि त्या करता प्रत्येक क्रियेत मनाचा प्रेझेंस असतोच, मग हे कसं घडतं. ह्याच्या एक्सप्लनेशनसाठी आयुर्वेदात एक उदाहरण दिलं जातं.  
समजा एक फ़ुल घेतलं आणि त्याच्या सगळ्यात बाहेरच्या पाकळीला सुई टोचली आणि ती पार शेवटच्या पाकळीपर्यंत नेली तर आपल्याला सगळ्याच पाकळ्या पिअर्स झालेल्या म्हणजे सुईने टोचल्या गेलेल्या दिसतात. ह्यावरून असं वाटतं की सगळ्या पाकळ्या एकाच वेळी पिअर्स झाल्या असाव्यात पण तसं नसतं एकामागोमाग एक अशा लाईनने त्या पाकळ्या पिअर्स होत जातात, पण बघितल्यावर सगळ्या पाकळ्या एकदमच पिअर्स झाल्यासारख्या वाटतात. एक्झॅक्टली अशाच प्रकारे माणसाचं मन काम करतं. ते फ़्रॅक्शन ऑफ़ सेकंदात प्रत्येक अवयवाशी कनेक्ट होत आणि त्याची क्रिया घडवून आणतं. नाही तर विचार करा जेवत असताना ते फ़क्त जेवणाच्या क्रियेवर कॉन्सन्ट्रेट करेल तेव्हा बघण्याची क्रिया किंवा दुसरी कुठलीही अ‍ॅक्शन बंद. विचार करा काय प्रॉब्लेम होईल आणि सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कामं संपणारच नाहीत. ही वेल ऑरगनाईज सिस्टीम आपल्या शरीरात कंडक्ट करणार्या भगवंताला आपण खरंच धन्यवाद द्यायला हवेत.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन कायम शरीरात प्रेझेंट असतं. अगदी आपण झोपेत असताना सुद्धा. मात्र कधी कधी ते झोपेतही अ‍ॅक्टीव असतं आणि मग माणसाला स्वप्न पडतात,असं आयुर्वेद सांगतो. तर महत्त्वाची गोष्ट ही की आजपर्यंत कोणालाही माणसाच्या शरीरातलं मन दाखवता आलेलं नाही आणि कुठल्याही टेस्ट इ.नी दिसलेलंही नाही. कुठल्याही मेडीकल ब्रान्चच्या स्टुडंटना अगदी सुरुवातीलाच शरीरातले टिश्युजपासून अगदी ब्रेनपर्यंतचे अवयव दाखवले जातात पण तिथेही मन दाखवता येत नाही. कारण आयुर्वेद म्हणतो की मनाचा प्रेझेंस अनुमानाने ओळखला जातो आणि ह्या जगात अनुमान करून जाणल्या जाणार्या असंख्य गोष्टी आहेत. साधीच गोष्ट बघा ना, आपण जी ब्लड टेस्ट करतो ती करण्यासाठी आपल्या शरीरातलं फ़क्त थोडंसं ब्लड घेतलं जातं आणि त्यावरून संपूर्ण शरीरातल्या ब्लडची कंडीशन काय आहे हे पाहीलं जातं . 
तर असं हे माणसाचं मन, काम करणार पण कधीच दिसून न येणारं. 
आयुर्वेद म्हणतो की माणसाला निरोगी राहण्यासाठी आणि रोगाचा मुकाबला करण्यासाठी मनाची स्ट्रेन्थ-सामर्थ्य आवश्यक आहे. ही मनाची स्ट्रेन्थ औषधापेक्षाही नामस्मरण, उपासना ह्यासारख्या गोष्टींतून मिळते. सध्याच्या काळात तर प्रत्येकाच्या मनाला अनेक आघाड्यांवर लढण्यासाठी सामर्थ्याची नितांत गरज आहे कारण सध्या प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या स्ट्रेस नाही तर भीती खाली वावरतो आहे आणि म्हणूनच एकमात्र भगवंताची-सद्‍गुरुंची भक्ती ही गोष्टच माणसाच्या मनाला सामर्थ्य देणारी आहे आणि ह्याचा अनुभव आजपर्यंत असंख्य लोकांनी घेतलेला आहे; कारण जो भक्ती करतो तोच निर्भय राहू शकतो.