Showing posts with label Ayurveda. Show all posts
Showing posts with label Ayurveda. Show all posts

Wednesday, April 27, 2011

अनादि अनन्त आयुर्वेद

२७-०४-२०११


ॐ

अनादि अनन्त आयुर्वेद

आयुर्वेद आपल्या भारतातलं सगळ्यात प्राचीन वैद्यकशास्त्र. खरं तरं आयुर्वेद हा कुणी लिहिलेला नाही. तो कसा अस्तित्वात आला, त्याविषयी आयुर्वेदात अगदी सुरुवातीलाच सांगितलं जातं. आयुर्वेद शिकणा-या स्टुडन्टसना अगदी सुरुवातीलाच ह्याची माहिती करून दिली जाते.
आयुर्वेद कुणाही मनुष्याने लिहिलेला नाही. तो जेव्हा मानवी जीवन अस्तित्वात आले, त्याच्या आधीपासूनच अस्तित्वात होता. म्हणून आयुर्वेदाला अनादि, अनंत असं म्हटलं जातं. अनादि-म्हणजे जो कधी लिहिला गेला किंवा कधी निर्माण झाला हे कोणीही सांगू शकत नाही, अनंत-म्हणजे कुठल्या एका पॉईंटला आता आयुर्वेदाचे नॉलेज संपलं असं होतच नाही. खरं तर प्रत्येक माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. कारण ह्या जगात आपल्याला शिकण्यासाठी प्रत्येक क्षणाला काही ना काही तरी असतंच. आयुर्वेद हा ब्रह्मा, प्रजापति, अश्विनीकुमार आणि इंद्र ह्यांच्याकडून आयुर्वेदाच्या आचार्यांकडे आला आणि त्यांच्याकडून मग गुरु-शिष्य परंपरेने आयुर्वेदाचं नॉलेज इतरांपर्यंत पोहोचलं.
पूर्वी जेव्हा लेखनकला म्हणजे कागद, शाई, प्रिंटींग ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या, तेव्हा मौखिक परंपरेने आयुर्वेद एका पिढीकडून पुढल्या पिढीकडे पोचला. म्हणजे गुरु शिष्यांना जे काही शिकवीत, ती प्रत्येक गोष्ट शिष्य अक्षरश: तोंडपाठ करायचे आणि मग ते इतरांना शिकवायचे. नंतर जेव्हा लेखनकलेचा शोध लागला, तेव्हा वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांवर, झाडाच्या खोडांच्या सालीवर (बार्क) ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या जाऊ लागल्या. ह्यातूनच आयुर्वेदाचे अनेक ग्रंथ निर्माण झाले, जे आजही प्रमाण मानले जातात. आजही आपल्याला काही म्युझियम्समध्ये पूर्वीचे काही वेगवेगळ्या विषयावरचे हस्तलिखित ग्रंथ पहायला मिळतात. आज कॉम्प्युटरचं एक बटन क्लिक केल्यावर आपल्याला हवी ती माहिती मिळते, तेव्हा नुसता विचार करून बघा की तेव्हा अशा प्रकारे हस्तलिखित निर्माण करायला, किती वेळ लागत असेल आणि किती श्रम घ्यावे लागत असतील.
वैद्यकशास्त्र शिकणा-यांना गुरुचे महत्त्व काय आणि किती असते, हे वेगळं सांगायची गरजच नाही आणि वैद्यकशास्त्र शिकणारे जेव्हा प्रॅक्टीस करायला लागतात, तेव्हा त्यांना परमात्म्याचं-सद्‍गुरुंचं महत्त्व अगदी प्रत्येक क्षणाला अनुभवाला येतं. "आय ट्रीट ही क्युअर्स’ ही गोष्ट वैद्यकशास्त्रात प्रसिद्धच आहे. मी स्वत:च्या प्रॅक्टीसमध्ये अनेक वेळा ह्याचा अनुभव घेतलेला आहे. श्रद्धावान ह्याला त्याच्या सद्‍गुरुंचा त्याला आलेला अनुभव म्हणतो. ह्या अनुभवामागे त्याचा त्याच्या सद्‍गुरुंवर असणारा विश्वास, श्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी असतातच.
अध्यात्मामध्ये अनेक वेळा कर्म-कर्मफ़ळ हा शब्द ऐकण्यात येतो. आयुर्वेदही कर्माचा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो की मनुष्याने केलेलं कुठलंही लहानात लहान कर्म का असेना, प्रत्येकाला त्याचं फ़ळ भोगावंच लागतं. झोपणं, बोलणं, खाणं, येणं, जाणं, बसणं अगदी विचार करणं हेदेखील कर्मामध्येच अंतर्भूत होतं आणि काहीही न करणं हेदेखील एक कर्मच आहे. कर्माविषयी सर्वांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत बापूंनी म्हणजेच सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराजात अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे.
म्हणजे आपली कुठलीही क्रिया ही कर्माच्या अंतर्गत जर येते तर आपल्या आजारी पडण्याचाही कर्माच्याशी काही तरी संबंध असलाच पाहिजे. नाही का?

Friday, January 28, 2011

ऋतुचर्या

ॐ
 २८-०१-२०११

ऋतुचर्या


खूप थंडी पडलेली असताना लिहिलेल्या पोस्टनंतर खूपच दिवसांनी ही पुढली पोस्ट. आता ब-याच ठिकाणी ब-यापैकी उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. 
क्लायमेट चेंज झाल्यानंतर घडणारी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारांची सुरुवात. आता थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्यावर सर्दी, खोकला यासारखे आजार डोक वर काढायला लागतात आणि ह्या रोगांच कारण आपल्याला माहीत असतंच, क्लायमेटमध्ये झालेला बदल आणि प्रत्येक वेळी असे क्लायमेटमध्ये बदल झाले की असे छॊटे मोठे आजार डोक वर काढतातच.
मग आज ह्याविषयीच थोड काही, अर्थातच आयुर्वेदाचा व्ह्यू. आपण संपूर्ण वर्षात तीन प्रकारच्या क्लायमेटचा अनुभव घेतो, उन्हाळा,पावसाळा आणि थंडी. अर्थात संपूर्ण जगात प्रत्येक ठिकाणी ह्याचं प्रमाण डिफ़र होतं. आयुर्वेद ह्यातीन प्रकारच्या क्लायमेटला सहा ऋतुंमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. हे सहा ऋतु- शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत.  हेमंत ऋतुत थंडीची सुरुवात होते आणि शिशिरात चांगलीच थंडी असते, वसंतात उन्हाळ्याची सुरुवात होते आणि ग्रीष्मात हा उन्हाळा खूप कडक होतो, वर्षा म्हणजे पावसाळा, शरदात पाऊस संपून पुन्हा एकदा उष्णता जाणवायला लागते म्हणजे ऑक्टोबर हिट. 
भारतीय कालगणनेनुसार सपूर्ण वर्षात १२ महिने असतात. जसे सध्या आपण जानेवारी ते डिसेंबर हे बारा महिने मानतो. ह्या १२ महिन्यातल्या प्रत्येक दोन महिन्यात मिळून एक ऋतु असं गणित असतं. म्हणजे आयुर्वेद काळात अशी कालगणना असायची. आता सगळ्या जगातच जानेवारी ते डिसेंबर असे बारा महिने असल्यामुळे आज काल ऋतु त्यानुसार डिव्हाइड केले जातात. 
प्रत्येक ऋतु मध्ये विशिष्ट क्लायमेट असतं आणि त्यानुसार मग आपल्याला आपलं बिहेवियर ठेवायला लागतं म्हणजे ज्या ऋतुत जसं क्लायमेट तसं आपलं जेवण इ. आयुर्वेदाने कोणत्या ऋतुत काय खायचं काय खायचं नाही, काय करायचं काय करायचं नाही ह्याचा पूर्ण विचार केलेला आहे आणि त्याला ऋतुचर्या असं नाव दिलेलं आहे. एकूण सहा ऋतुंच्या सहा ऋतुचर्या. मग ह्यामध्ये काय खायचं काय नाही इथपासून ते कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे हे सगळं सांगितलेलं आहे. फ़ॉर एक्झाम्पल शिशिर ऋतुमध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं मग अशावेळी लोकरीचे जाड कपडे घालणं आवश्यक आहे. तर उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायचे. ऋतुचर्येतला महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या ऋतुत कोणत्या दोषाचा प्रकोप होतो आणि का होतो, हे सविस्तर सांगितलेलं आहे आणि मग त्यावर काय उपाय करायचे ते देखील सांगितलेलं आहे. जसं आता थंडी संपून उन्हाळा सुरू झाला की सर्दी , खोकला होतो कारण जसा उष्णतेने बर्फ़ वितळतो तसाच बाहेरच्या उष्णतेमुळे थंडीत शरीरात अ‍ॅक्युम्युलेट झालेला कफ़ पातळ होतो आणि सर्दी, खोकला ह्यांची सुरुवात होते, तसचं पावसाळ्यात शरीरात पित्त अ‍ॅक्युम्युलेट होतं आणि ते शरद ऋतुतल्या उष्णतेने शरीरात वेगवेगळे रोग उत्पन्न करू शकतं त्याचप्रमाणे उन्हाळ्यात शरीरात वात अ‍ॅक्युम्युलेट होतो आनि तो त्यानंतर येणा-या पावसाळ्यात वाताचे वेगवेगळे डिसीजेस उत्पन्न करू शकतो. 
अर्थात ह्या क्रिया जरी नॅचरल असल्या तरी त्यावरचा उपायही आयुर्वेदा सांगतो कारण शेवटी आयुर्वेदाला माणसाची हेल्थ चांगली ठेवायची आहे. म्हणूनच ह्यावरचा पहिला उपाय आयुर्वेदाने सांगितला आहे,तो म्हणजे एक ऋतु बदलून जेव्हा दुसरा सुरू होणार असतो तेव्हा जाणा-या ऋतुचा शेवटचा आठवडा आणि येणा-या ऋतुचा पहिला आठवडा, ज्याला ऋतुसंधि म्हटलं जातं, त्यात आधी आपण जे सगळे जेवणाचे, वागण्याचे रुल्स फ़ॉलो करतो ते हळूहळू सोडून द्यायचे आणि हळूहळू नव्या येणा-या ऋतुच्या जेवण्या-वागण्यासंबंधीच्या रुल्सना फ़ॉलो करायचं. ह्यामुळे जरी शरीरात वर सांगितल्याप्रमाणे नॅचरल चेंजेस घडले म्हणजे शरीरातले दोष विशिएट झाले तरी ते कंटोलमध्ये राहतील आणि डिसीज उत्पन्न करू शकणार नाहीत. दुसरा आयुर्वेदाचा उपाय म्हणजे विशिष्ट ऋतुत विशिष्ट पंचकर्म करणं. आजकाल पंचकर्म हा शब्द ब-याच जणांना ऐकून माहीत आहे. ह्या पंचकर्माविषयी पुढे कधीतरी सविस्तर बोलूया.       
ह्यात आणखी एक महत्त्वाची इन्फ़र्मेशन द्यायची म्हणजे कुठल्या ऋतुत कुठलं पाणी प्यायचं, तेही ऋतुचर्येत सांगितलेलं आहे. शरद ऋतुत अगस्ती नावाच्या ता-याचा उदय होतो आणि त्यावेळी सगळ्या पॉन्डस, लेक्स मधल पाणी निर्विष होतं असं आयुर्वेदात वर्णन येतं, त्याला त्यांनी हंसोदक असं नाव दिलेलं आहे. कारण हंस नेहमी फ़क्त शुद्ध पाणीच पितो, असं सांगितलं जातं आणि म्हणूनच शुद्ध पाण्याला त्याकाळी हंसोदक ही उपमा दिली जात असावी. आज काल आपल्याला प्युरिफ़ाइड पाणी सहज मिळतं त्यामुळे आपल्याला त्या काळातल हे पाण्याविषयीचं वर्णन वाचून आश्चर्य वाटेल.  
आता सध्या काही दिवसांपूर्वीच संक्रांत होऊन गेली. खर तर संक्रांत म्हणजे संक्रमण. ह्या वेळी सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. त्यामुळे आता भारतात दिवस हळूहळू मोठा व्हायला सुरुवात होते. ह्या वेळी संक्रांतीच्या वेळी असंख्य स्त्रियांनी बापूंनी रामराज्याच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे "श्रीमंगलचण्डिकानैमित्तिकप्रपत्ती’’ केली. ह्याचा मुख्य उद्देश्य बापूंनी सांगितला होता की "ही प्रपत्ती करणारी स्त्री तिच्या कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते”. ह्याविषयी बापूंनी आणखी जे काही सांगितलेलं आहे, ते मूळातून वाचण्यासारखं आहे. पण ह्यावरून आपल्या मुख्य ही गोष्ट लक्षात येईल की ही प्रपत्ती करणारी स्त्री स्वत:तर सबल बनतेच आणि इतकी सबल बनते की तिच्यामध्ये तिच्या पूर्ण कुटुंबाचं रक्षण करण्याची कपॅसिटी येते. रियली अमेझिंग. कारण रक्षण करायला फ़िजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारची स्ट्रेंथ लागते आणि ही प्रपत्ती केल्याने अर्थातच ती मिळते. रामराज्याच्या प्रवचनात बापूंनी पुरुषांसाठी श्रावणातल्या सोमवारी "श्रीरणचण्डिकानैमित्तिकप्रपत्ती” सांगितली होती, जी अर्थातच मागच्या वर्षी श्रावण महिन्यात पुरुषांनी केलीही. 
सध्याचा काळ बघितला तर रोजच्या लाइफ़मध्येच आपण एवढ्या स्ट्रेस आणि स्ट्रेन्सना सामोरे जात असतो की अशा वेळी आपल्याला फ़िजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारच्या स्ट्रेन्थच महत्त्व आणि गरज लक्षात येते आणि माणसाने कितीही एफ़र्टस केले तरी ह्या दोन्ही स्ट्रेन्थ एकाच वेळी आणि प्रत्येकासाठी उचित तेवढ्या प्रमाणात केवळ सद्‍गुरुच देऊ शकतात.

Friday, December 24, 2010

आहार

ॐ                   आहार                                           २४-१२-२०१०
सगळीकडेच खूप मस्त थंडी पडलीय़ॆ. अशा थंडीत साहजिकपणेच काही तरी स्पाईसी खावंसं वाटतं, नाही का? स्पाईसी खायचं म्हणजे त्यात स्पाईसेस असणारचं आणि स्पाईसेस म्हणजे आपले मसाल्याचे पदार्थ जे भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग असतात. अगदी भाजीच्या फ़ोडणीपासून ह्या मसाल्यांच्या वापराची सुरुवात होते. साधी आपली मोहरी, हळद आणि हिंग हे फ़ोडणीचे तीन बेसिक घटक मसाल्याच्याच पदार्थातले आहेत आणि मसाले म्हणजे तिखट, चटपटीत, जेवणाला चव देणारे अशी आपल्याला त्यांची साधारण ओळख असते पण आयुर्वेद ह्या पदार्थांचे औषधी गुणधर्म सांगतो. वास्तविक त्यांचा रोजच्या जेवणात वापर करण्यामागे महत्त्वाची संकल्पना अशी असावी की रोजच्या रोज थोड्याशा प्रमाणात त्यांचे गुण जेवणातून पोटात जावेत. सगळ्याच मसाल्याच्या पदार्थांचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते ज्या पदार्थात घातले जातात त्याची चव वाढवतात. मसाल्याच्या पदार्थांचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे ते काही प्रमाणात अन्नपचनालाही मदत करतात. पण जवळ जवळ सगळेच मसाल्याचे पदार्थ हे गरम-ऊष्ण, तिखट असतात, त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास असतो किंवा इतरांनीही ते जपूनच वापरले पाहिजेत आणि खरं सांगायचं तर कुठल्याही पदार्थात प्रमाणापेक्शा जास्त मसाले पडले तर त्याची चवच बिघडते. आता स्पाईसेस यादीतल्या नेहमीची मंडळींची ही थोडी ओळख- मोहरी-सरसों(मस्टर्ड), हळद(टर्मरिक), हिंग(असॆफ़ोटीडा) हे प्रत्येक फ़ोडणीचा बेस ह्याशिवाय तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, जावित्री, आलं,लसूण,ओवा,वेलची-छोटी आणि मोठी, जावित्री, जायफ़ळ, मिरची इ.
हे सगळे जरी मसाल्याचे पदार्थ ह्या कॅटेगरीत मोडणारे असले तरी प्रत्येकाची स्वत:ची वेगळी प्रॉपर्टी आहे.
हळद, सगळ्यात बेस्ट ब्लड प्युरीफ़ायर. भारतात लग्नाच्या आदल्या दिवशी वधू-वरांना हळद लावण्याची प्रथा आहे.  हळद जशी इंटर्नली घेता येते तशी ती एक्सर्टनली सुद्धा वापरता येते. ब्लड प्युरिफ़ायर असल्यामुळे ती त्वचेचा रंग उजळण्याचं काम करते. हळदीची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अ‍ॅटीसेप्टीकचं कामही खूप मस्त करते आणि जखमेतलं रक्त थांबविण्याचं कामही करते. त्यामुळे कुठेही खरचटलं किंवा छोटीशी जखम झाली आणि रक्त यायला लागलं की पहिली हळद त्यावर लावली जायची. त्यामुळे रक्त थांबायचं, जखम भरायची आणि कुठलंही इन्फ़ेक्शन देखील होत नसे. हिंग हा गॅसेस वर सगळ्यात चांगला समजला जातो. पूर्वी लहान मुलांना गॅस होऊन पोट जर फ़ुगलं तर पाण्यात हिंग मिक्स करून तो पोटावर लावला जायचा. अगदी मोठ्या माणसांनाही गॅसेस झाले तर ते जेवणाच्या शेवटी ताकाबरोबर हिंग घ्यायचे. गॅसेसमुळे होणार्या पोटदुखीवर ओवा सगळ्यात बेस्ट औषध. हे सगळे मसाल्याचे पदार्थ म्हणजे हळद, मोहरी इ. ड्राय़ वापरले जातात. पण आलं(जिंजर), लसूण(गार्लिक) ह्यासारखे पदार्थ वेट-ओले-फ़्रेश वापरले जातात. हळद कधी कधी ओलीही वापरली जाते पण त्याचं लोणचं इ. करून. आलं हे पचन-डायजेशन अतिशय चांगलं करणार आहे आणि हेच आलं सुकवून त्याच्यापासून जी सुंठ बनवली जाते ती तर अनेक रोगांवर रामबाण इलाज. म्हणजे जर आलं मिळाल नाही तरी सुंठीचा पर्याय कधीही मिळू शकणारा. 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मसाल्याच्या पदार्थांची झाड असतात. ह्यातलं आलं, हळद आणि लसूण हे पदार्थ जमिनीखाली मिळतात. थंडीच्या दिवसात लसूण तिच्या पानांसकट मिळते, पातीच्या कांद्यासारखी. काळीमिरी वेलावर लागते. तमालपत्र म्हणजे एका विशिष्ट झाडाची पानं-लिव्हज, दालचिनी म्हणजे त्याच झाडाची साल-बार्क.वेलची अगदी छोट्याशा झाडावर लागते. जायफ़ळ मोठ्या झाडाला लागतं आणि  जायफ़ळावर जी साल असते तिला जावित्री म्हणतात, तर लवंग म्हणजे  झाडाची कळी-बड, हिंग म्हणजे  झाडाच्या स्टेममधून बाहेर पडणारा एक प्रकारचा गोंद-रेझीन. मोहरीची झाडंही छॊटी असतात. सरसों नावाचा मोहरीसारखाच पदार्थ असतो आणि ह्या सरसोंच्या पानांची भाजी केली जाते त्याला  सरसों का साग म्हणतात. 
आता शेवटी थोडं महत्त्वाचं. ह्या थंडीच्या सीझनमध्ये वातावरणात खूप ड्रायनेस असतो त्यामुळे ह्या काळात शरीरातला ड्रायनेस वाढविणारे पदार्थ खाऊ नयेत. आहारातली कडधान्य शरीरात ड्रायनेस वाढवतात, म्हणून त्यांचा वापर टाळावा. "श्रीवर्धमान व्रताधिराज”च्या नऊ अंगांपैकी एक अंग आहारासंबंधी आहे आणि त्यात आहाराबद्दल विशेषरूपाने सांगण्यात आलेलं आहे. ह्या सीझनमध्ये तिळाचं तेल सगळ्यात बेस्ट- खाण्यासाठी आणि शरीरावर लावण्यासाठीही. आज आपण अनेक प्रकारची तेल वापरतो पण आयुर्वेदात वर्णन येतं की जे तिळापासून काढलं जातं त्यालाचं "तेल’’-ऑईल म्हणतात. तिळाच तेल सगळ्या प्रकारच्या तेलांमध्ये स्निग्ध आहे. थंडीतल्या ड्रायनेसवर सगळ्यात चांगला उपाय. "श्रीवर्धमान व्रताधिराज”चं एक अंग तिळाच्या तेलाच्या वापराविषयी आहे. अर्थात उपासना हे ह्या व्रताचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळे "श्रीवर्धमान व्रताधिराज” म्हणजे माणसांच्या मेंटल आणि फ़िजिकल दोन्ही प्रकारच्या हेल्थची सर्वोत्तम काळजी घेणारं. 
सो, आजसाठी एवढंच. आता बहुतेक आपली भेट न्यू इयरमध्येच. सो, हॅपी न्यू इयर टू ऑल इन अ‍ॅडवान्स.

Thursday, November 4, 2010

अभ्यंगस्नान

ॐ 
०४-११-२०१०
 अभ्यंगस्नान

दिवाळीचा पहिला दिवस. पहाटे पहाटे उठायचं. सगळीकडून फ़टाक्यांचे आवाज यायचे. थंडीही चांगलीच असायची. दारासमोरचा कंदील, अंगणात काढलेली रांगोळी आणि  घरात सगळ्यांची अभ्यंगस्नानासाठी चाललेली लगबग. पाट, त्याभोवती रांगोळी, दुधात भिजवलेल्या उटण्याचा सुगंध. मग प्रत्येकाच्या आंघोळीच्या वेळी लावले जाणारे फ़टाके आणि नंतर नवे कपडे घालून देवाला नमस्कार करून, फ़राळाचा नैवेद्य देवाला अर्पण करून, घरातल्या वडीलधार्यांना नमस्कार करून मग  केला जाणारा फ़राळ. आमच्या लहानपणची दिवाळी अशीच काहीशी असायची.
नरकचतुर्दशी, दिवाळीचा पहिला दिवस. नरकासुराचा वध केला तो दिवस. पूर्वी पहाटे पहाटे रेडियोवर नरकासुराच्या वधाचं कीर्तन लागायचं आणि मंगलमय वातावरणात सुरू झालेली ही दिवाळी कधी तीन तर कधी चार दिवसांपर्यंत चालायची. 
दिवाळीची सुरुवात व्हायची ती अभ्यंगस्नानाने. अंगाला तेल लावलं जायचं आणि मग त्यावर दुधात भिजवलेलं उटणं संपूर्ण अंगाला लावलं जायचं. आयुर्वेदात खरं तर हे अभ्यंग रोजच्या रोज करावं असं सांगितलेलं आहे. आपण रोज संपूर्ण दिवसात काय काय करायला हवं म्हणजे आपलं आरोग्य टिकवण्यासाठी काय काय करायला हवं, हे सांगण्यासाठी आयुर्वेदाने  दिनचर्या म्हणजे संपूर्ण दिवसात काय करावं ते सांगितलेलं आहे. ह्या दिनचर्येची सुरुवातच उठण्यापासून होते. उठल्यानंतर दात कशाने घासावेत इथपासून सगळ्या गोष्टी सविस्तर आणि सकारण सांगितलेल्या आहेत. मजा माहितेय का, जेव्हा टूथब्रशचा शोधही लागला नव्हता तेव्हा बाभूळ, कडुनिंब, खैर, करंज ह्या वनस्पतींच्या ट्विग्ज दात घासण्यासाठी वापरल्या जायच्या आणि त्रिकटु म्हणजे सुंठ, मिरी व पिंपळी ह्यांच सारख्या प्रमाणात एकत्र चूर्ण थोड्याशा मधात मिक्स करून दात घासण्यासाठी वापरलं जायचं. काही वर्षापूर्वीपर्यंत बरेच लोक दात घासण्यासाठी बाभळीच्या ट्विग्ज वापरतही होते, पण आता त्या फ़ारशा कुठे दिसत नाहीत. ह्याचा मुख्य फ़ायदा म्हणजे ह्याने दात  आणि हिरड्या चांगल्या मजबूत व्हायच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे दात किडण्यापासूनही बचाव व्हायचा. कारण बाभूळ दात आणि हिरड्या दोन्हीला चांगला बळकट करणारा, कडुनिंब दाताला कीड लागण्यापासून रोखणारा, खैर आणि करंजही हेच काम करणारे.   
आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी जे अभ्यंगस्नान करतो, त्यातलं अभ्यंग आणि स्नान हे दोन्ही  ह्या दिनचर्येत सांगितलेले आहेत.
अभ्यंग म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावणे, थोडक्यात तेलाने मालीश करणे आणि त्यानंतर उदवर्तन म्हणजे उटणे लावणे. अर्थातच आधी अभ्यंग आणि मग उदवर्तन हाच क्रम. हे अभ्यंग का करायचं? ह्याचं कारणही आयुर्वेदाने खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. आपल्या शरीराच्या त्वचेत आपल्या नर्व्हज असतात आणि ह्याच नर्व्हजमार्फ़त ब्रेनपर्यंत सेन्सेशन पोचवले जाते. आयुर्वेदानुसार हे काम वायु म्हणजेच शरीरात राहणार्या वात ह्या दोषाचे आहे. मग हे काम नीट होण्यासाठी नर्व्हज आणि मुख्य म्हणजे शरीरातला वात दोष व्यवस्थित रहायला हवा. तो तसा राहण्यासाठी तेलाने केलेल्या अभ्यंगाची फ़ार मदत होते कारण तेल हे शरीरातल्या वातावर काम करणार अत्यंत गुणकारी औषध आहे. अभ्यंगानंतर उदवर्तन केलं जातं म्हणजेच उटणं लावलं जातं. ह्यामुळे स्किनवर जी पोअर्स असतात, ज्यातून आपला घाम बाहेर पडतो, ती पोअर्स क्लिन व्हायला मदत होते. कारण ही पोअर्स क्लिन झाल्यानेच शरीरातला स्वेट म्हणजे घाम योग्य प्रकारे बाहेर टाकला जातो. कारण घामावाटे शरीरातले अनेक अनावश्यक घटक बाहेर टाकले जात असतात. मात्र उटणं लावताना नेहमी एक गोष्ट लक्शात ठेवायला हवी की त्वचेवर नेहमी वरच्या दिशेने उटणं लावायला हवं म्हणजेचं त्वचेवरच्या केसांची जी डिरेक्शन आहे त्याच्या अपोझिट- अपवर्ड डिरेक्शनमध्ये उटणं लावायला हवं. 
आता ह्याचे फ़ायदे आपण वर बघितलेच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामुळे स्किनचं सौंदर्य वाढायला मदत होते. 
खरं तर असं अभ्यंग रोजच करायला हवं. पण आपण हल्ली निदान दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरी आठवणीने अभ्यंगस्नान करतो. 
आज आपल्याला मन, आत्मा सारख्या विषयांवर आयुर्वेदाचं मत बघायचं होतं. पण अभ्यंगाच्या विषयात तो मुद्दा मागेच राहिला. पण मनाचा आणि ह्या अभ्यंगाचंही परस्परांशी रिलेशन आहे आणि ते म्हणजे अभ्यंग आपल्या मनालाही प्रसन्न करतं. खरं तर मन ह्या विषयावर एवढं काही बोलण्यासारखं आहे की ते आपण सविस्तरच पाहू. मनाबद्दल अगदी सोप्या भाषेत, प्रत्येकाला कळेल अशा पद्धतीने बापूंनी ग्रंथराजाच्या प्रेमप्रवास खंडात सांगितलेलं आहे. खर सांगायच तर ज्यांना आयुर्वेद माहीत आहे किंवा जे आयुर्वेद शिकलेले आहेत त्यांच्यासाठी हा ग्रंथराज म्हणजे माहितीचा खजिना आहे. कारण आयुर्वेदातले अनेक कन्सेप्टस ह्यात बापूंनी अगदी प्रत्येकासाठी अतिशय सोपे करून सांगितलेले आहेत. हा माझा स्वत:चा अनुभव आहे.  
तर मन ह्या विषयावर आपण पुढल्या पोस्टमध्ये नक्की बोलू. 
आज दिवाळीच्या शुभेच्छा देऊन इथेच निरोप घेऊया.